‘अ‍ॅस्ट्रिक्स’ची कॉमिक्स, स्टीफन झ्वाइगच्या कादंबऱ्या किंवा फ्रान्झ काफ्काची ‘द कॅसल’ ही गाजलेली लघुकादंबरी यापैकी काही ना काही ज्यांनी इंग्रजीत वाचले, त्यांना अँथिआ बेल यांचे नाव माहीत असायला हवे.. पण ते माहीत नसणे, हेच अँथिआ यांचे कर्तृत्व होते! अनुवाद म्हणून त्या नेहमीच ‘अदृश्य’ राहिल्या.  साहित्यकृती- मग ती मुलांसाठी लिहिलेली असो की प्रौढ विद्वानांसाठी- तिचा आशय चोखपणे वाचकापर्यंत पोहोचवणे हेच आपले काम, अशा विश्वासाने १९६९ पासून २०१७ पर्यंत, म्हणजे सुमारे अर्धशतकभर त्या कार्यरत राहिल्या. ‘अ‍ॅस्ट्रिक्स’चे काम त्यांच्याकडे १९७० साली आले, तेव्हा ही काहीशी विनोदी चित्रकथामाला इंग्रजीत नव्हतीच. ती होती फ्रेंच भाषेत. एकाच शब्दाला दोनदोन अर्थ असण्यासाठी फ्रेंच भाषा प्रसिद्धच. तिचे इंग्रजीसारख्या परीटघडीच्या, नेटक्या भाषेत रूपांतर करणे हे कठीण काम होते. या चित्रकथेतील कुत्र्याला ‘डॉग्मॅट्रिक्स’ हे नाव अँथिआ यांनी दिले, अन्य काही उप-पात्रांचीही नावे अशाच प्रकारे बदलली आणि अ‍ॅस्ट्रिक्सने इंग्रजी वाचकांसाठी नवा अवतार घेतला! हे असे ‘अवतारकार्य’ करण्याची संधी जिथेजिथे मिळाली, तिथेतिथे अँथिआ यांनी ती विनासंकोच घेतली- किंबहुना इंग्रजीखेरीज फ्रेंच, जर्मन भाषांवर त्यांचे प्रभुत्व आणि डॅनिश भाषेचेही ज्ञान, अशा त्यांच्या योग्यतेमुळे त्यांना ती घेता आली. फ्रॉइडच्या ‘सायकोपॅथॉलॉजी ऑफ एव्हरीडे लाइफ’चा अनुवाद करताना काही पारिभाषिक शब्दही त्यांनी बदलले आणि फ्रॉइडची अन्य भाषांतरे तोवर उपलब्ध असूनही अँथिआ यांचे शब्द विद्वानांनी स्वीकारले. ‘साहित्यकृतीचा आवाज आला, सूर कळला, की अनुवाद करणे  सोपे’असे त्या म्हणत. साहित्यसेवेबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (२०१०) हा मायदेशाचा, तर ‘क्रॉस ऑफ मेरिट’ (२०१५) हा जर्मन किताब मिळाला. या अँथिआ बेल यांचे १८ ऑक्टोबर रोजी, ८२ व्या वर्षी  निधन झाल्याची वार्ता भारतात मात्र (एकंदर अनुवादकार्याप्रमाणे) दुर्लक्षितच राहिली.