X

अनुराधा राव

१९८२च्या प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या तुकडीतून त्या स्टेट बँकेत दाखल झाल्या.

भांडवली बाजाराच्या निर्देशांकांनी वार्षिक उच्चांक गाठल्याच्या पाश्र्वभूमीवर अनुराधा राव यांची एसबीआय म्युच्युअल फंडाच्या प्रमुखपदी निवड झाली. ३० जून २०१६ रोजी १.२० लाख कोटी रुपयांची मालमत्ता असणारा एसबीआय म्युच्युअल फंड ही कंपनी मालमत्ता व्यवस्थापनात देशातील पाचव्या क्रमांकावर असलेली ही म्युच्युअल फंड आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झालेली एका महिलेची नेमणूक ही गोष्ट खचितच दखल घेण्यायोग्य आहे.

१९८२च्या प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या तुकडीतून त्या स्टेट बँकेत दाखल झाल्या. स्टेट बँकेच्या एकूण कर्ज वितरणापैकी मोठा हिस्सा व्यापणाऱ्या गृहकर्ज विभागाचा पाया विस्तारण्याचे श्रेय अनुराधा राव यांना जाते. २००८ ते २०११ या दरम्यान त्या स्टेट बँकेच्या उपमहाव्यवस्थापक व गृहकर्ज विभागाच्या प्रमुख असताना त्यांनी जी धोरणे आखली व राबवली त्यामुळे अधिक गृहकर्ज इच्छुकांना आपल्याकडे वळविण्यात स्टेट बँकेला यश आले. स्टेट बँकेचे आजचे गृहकर्ज ‘एसबीआय मॅक्सगेन’ हे राव यांनी यशस्वी केलेल्या गृहकर्जाचे सुधारित रूप आहे.

गेली ३३ वर्षे स्टेट बँकेच्या सेवेत असणाऱ्या राव या एसबीआय म्युच्युअल फंडात नेमणूक होण्यापूर्वी स्टेट बँक समूहातील मुख्य बँकेत उपव्यवस्थापकीय संचालक होत्या. उपव्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती मिळण्याआधी मुख्य महाव्यवस्थापक व वैयक्तिक बँकिंग विभागाच्या प्रमुखही त्या राहिल्या होत्या. ‘प्रत्येक भारतीयाची बँक’ हे बिरुद स्टेट बँकेला लाभते ते सर्वात मोठे व्यक्तिगत बँकिंग असल्यानेच. ९ लाख कोटींच्या ठेवी व १.२५ लाख कोटींची कर्जे या विभागाच्या अंतर्गत येत असल्याने हा विभाग स्टेट बँकेच्या व्यवसायाचा कणा समजला जातो.

एसबीआय म्युच्युअल फंड हा लाख कोटी रुपयांहून अधिक निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांच्या पंगतीत आहे. देशातील एकूण ४३ फंड कंपन्यांमध्ये या कंपनीचे स्थान पहिल्या पाचातील. म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेच्या आकारमानावर आधारित पहिल्या पाच क्रमांकासाठी तीव्र स्पर्धा आहे. देशातील आद्य म्युच्युअल फंड असलेल्या यूटीआय म्युच्युअल फंडाला मागे सारून एसबीआय म्युच्युअल फंडाने गेल्या वर्षी पहिल्या पाचात स्थान प्राप्त केले आहे. बँकांच्या ठेवीतील वाढ मंदावण्यास सामान्य जनतेच्या बचतीचा ओघ ‘सिप’च्या माध्यमातून म्युच्युअल फंडांकडे वळणे हे एक कारण आहे.  सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ  न देता हा ओघ वाढवणे ही जबाबदारी देशातील एका प्रमुख म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणून राव यांच्यावरदेखील तेवढीच राहणार आहे. स्टेट बँकेत गृहकर्ज विभाग अनोख्या उत्पादनांसह यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या राव यांच्या कल्पक योजना आता एसबीआय म्युच्युअल फंड कंपनीसाठी प्रतीक्षेत असतील.