एखाद्या प्राध्यापकाने नित्यनेमाने सेवा पूर्ण झाल्यावर निवृत्त व्हावे; पण विद्यार्थ्यांचे त्याच्या शिकवण्यावर एवढे प्रेम असावे की, संस्थेला त्या प्राध्यापकास पुन्हा विद्यार्थ्यांची सेवा करण्याची विनंती करण्याची वेळ यावी असे भाग्य क्वचितच प्राध्यापकांना लाभत असेल. त्यापैकीच एक होते व्हिन्सेंट स्कली. त्यांच्या निधनाने एक नामवंत कला व स्थापत्य इतिहासकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

येल विद्यापीठात त्यांनी साठ वर्षे अनेक विद्यार्थ्यांना भारावून टाकले. त्यांचे स्थापत्यकलेवरील लेखनच मुलांना त्यांच्याकडे खेचून आणत होते. ग्रीक मंदिरे, पॅलाडियो व्हिला, अमेरिकन इंडियन प्युब्लो अशा अनेक विषयांवर लेखन करताना त्यांनी स्थापत्यकलेतील आधुनिकता टिपली. कुठल्याही संस्कृतीचा इतिहास हा त्या काळाशी केलेला संवादच असतो असे ते मानत. येल विद्यापीठात ते १९४७ पासून अध्यापन करीत होते. १९९१ मध्ये स्टर्लिग प्रोफेसर एमिटेरेट्स म्हणून ते निवृत्त झाले, पण लगेच पुढील वर्षी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांना पुन्हा विद्यापीठात शिकवण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनीही कला इतिहासाच्या प्रेमातून हे आव्हान स्वीकारले. नंतर त्यांनी ‘इंटड्रक्शन टू दी हिस्टरी ऑफ आर्ट्स’ हा अभ्यासक्रम सुरू केला. नंतर २००९ पर्यंत ते अध्यापन करीत राहिले. त्यांची विद्यार्थ्यांसमोरची व्याख्याने ही नाटय़मय असत. ते त्यांना जुन्या काळात केव्हा घेऊन जात ते समजतही नसे, ते कधी पुस्तकातून किंवा नोट्स पाहून बोलत नसत. ते बोलत असताना विद्यार्थ्यांनी काही लिहून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांना कधीच नव्हती. त्यांच्या व्याख्यानात अनेक प्रोजेक्टरमधून पडद्यावर प्रतिमा अवतरत असत. खोलीत अर्थात अंधार असे, स्कली यांच्या हातात लेसर पॉइंटर, तोच टेबलावर आपटून पुढची स्लाइड दाखवण्यास ते सांगत. त्यांनी एकदा केविन रोश यांच्या स्थापत्यरचना असलेल्या इमारतींबाबत टीकात्मक मत मांडले होते.  ते रोजच्या विषयांचा संदर्भ देत आधुनिक कला इतिहासावरही प्रकाश टाकत. त्यांनी स्थापत्यरचना केवळ पोकळ्यांमधून दाखवली नाही, तर त्याला प्रत्यक्ष समाजबांधणीचा साज दिला. त्यांना अमेरिकेतील प्रत्येक स्थापत्यरचनाकाराचे काम माहिती होते. फिलिप जॉनसन व लुईस कान हे दोन स्थापत्य कलाकार त्यांचे खास स्नेही होते. यातील कान यांनी येल आर्ट गॅलरी व येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्ट या वास्तू उभ्या केल्या. रॉबर्ट व्हेंचुरी यांच्या ‘कॉम्प्लेक्सिटी अँड काँट्रॅडिक्शन इन आर्किटेक्चर’ या पुस्तकाला त्यांनी दिलेली प्रस्तावना व्हेंचुरी यांचा ले कोरबिझीयर यांच्यानंतरचा चांगला स्थापत्य विशारद म्हणून गौरव करणारी आहे. नागरीकरणाने अमेरिकेत शहरांची झालेली हानी लांच्छनास्पद आहे असे त्यांचे मत होते. ‘अमेरिकन आर्किटेक्चर अँड अर्बनिझम’, ‘आर्किटेक्चर – द नॅचरल अँड मॅनमेड’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. गरिबांना विस्थापित करून मोठे मार्ग बांधणे त्यांना मान्य नव्हते. शहराच्या आजूबाजूचा परिसर याला आधुनिक रचनेत महत्त्व आहे, असे त्यांचे मत होते. १९९० मध्ये त्यांनी अँड्रीयस डय़ुअनी व एलिझाबेथ प्लॅटर या त्यांच्याच विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नवशहरीकरण संकल्पनेला पाठिंबा दिला, पण त्यात शहराची संकल्पना ही तेथील पादचाऱ्यांच्या सोयी, मानवी संस्कृती यांना प्राधान्य देणारी व स्थापत्यकलेला सामाजिकतेचे भान देणारी होती. वयाच्या तिशीत त्यांनी लिहिलेले ‘दी अर्थ, दी टेम्पल, अँड दी गॉड्स- ग्रीक सेक्रेड आर्किटेक्चर’ हे पुस्तक गाजले. ग्रीसमधील अनेक वास्तूंना भेटी देऊन त्यांनी त्यांचे अनुभव या पुस्तकातून मांडले आहेत. स्कली यांच्या स्थापत्यकलेच्या विवेचनात नेहमीच वास्तूंइतकेच त्यात वावरणाऱ्या माणसांना महत्त्व दिलेले होते.