‘डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी स्वत:ची उमेदवारी घोषित केली असली, तरी आम्हाला ते महत्त्वाचे उमेदवार वाटत नाहीत. सबब त्यांच्या भाषणांचे वार्ताकन राजकीय पानांवर न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्थात, त्याऐवजी मनोरंजन विभागात या वार्ताकनास जरूर स्थान दिले जाईल. ज्यांना या डोनाल्डच्या मुखात आज काय आहे याबद्दल जाणून घ्यायचे असेल त्यांना कर्दाशियान वगैरेंच्या बातम्यांसोबत आता हाही मजकूर वाचता येईल’ – निष्पक्षतेच्या शिक्क्याला पार लाथाडून टाकणारी ही जाहीर सूचना ज्या ‘हफिंग्टन पोस्ट’ने अवघ्या महिन्याभरापूर्वी- १७ जुलै २०१६ रोजी वाचकांना दिली; त्याच्या संस्थापक-संपादक आरियाना हफिंग्टन या आता ‘हफिंग्टन पोस्ट’ सोडून जात आहेत! ११ ऑगस्ट रोजी आरियाना यांनीच ही निवृत्ती जाहीर केली. ‘थ्राइव्ह’ नावाचे, वाढत्या वयातही स्वत:ला मजेत-मस्त-तंदुरुस्त ठेवण्यास मदत करण्याचा दावा करणारे एक पुस्तक त्यांनी अलीकडेच लिहिले होते; त्याच्या यशानंतर आता त्या ‘थ्राइव्ह ग्लोबल’ या कंपनीच्या कामात स्वत:ला गाडून घेणार आहेत. ‘हफिंग्टन पोस्ट’ किंवा ‘हफ-पोस्ट’ हे फक्त इंटरनेटवरच चालणारे वृत्तपत्र. तासातासाला निरनिराळा मजकूर त्यावर असावा, यासाठी हौशी लेखकांनाही (त्यापैकी बऱ्याच जणांना तर कोणत्याही मानधनाविनाच) संधी देण्याची- आणि तरीही ‘वृत्तपत्र’ म्हणूनच सादर होण्याची पद्धत ‘हफ-पोस्ट’ने सुरू केली आणि आरियाना या अशा प्रकारच्या पत्रकारितेच्या अग्रणी ठरल्या; त्यानंतर ‘जगाच्या माध्यम-विश्वातील पाच महत्त्वाच्या महिलां’मध्ये होणारी आरियाना यांची गणना आता त्यांचा नवा निश्चय कायम राहिल्यास थांबणार आहे.

ग्रीसमध्ये जन्म, उमेदीचा काळ ब्रिटनमध्ये, अशी मजल-दरमजल करीत आरियाना १९८० साली अमेरिकेत आल्या आणि १९८६ मध्ये मायकल हफिंग्टन यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. हे मायकल पुढे (१९९३-९७) रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. आरियानादेखील याच काळात ‘रेसिग्नेशन.कॉम’ या नावाचे संकेतस्थळ चालवून, बिल क्िंलटन यांच्या राजीनाम्यासाठी लोकांचा दबाव आणू पाहात होत्या! मग ‘आरियाना.कॉम’ हे ब्लॉगवजा संकेतस्थळ त्यांनी सुरू केले आणि एखाद्या वृत्तपत्रीय स्तंभलेखनाप्रमाणे या संकेतस्थळावर लिखाण सुरू ठेवले. त्यास लोकांची साथ मिळत गेली आणि २००५ मध्ये ‘हफिंग्टन पोस्ट’ हे पहिले र्सवकष महाजालीय वृत्तपत्र सुरू झाले. याआधीच (१९९७ मध्ये) आरियाना व मायकल यांचा घटस्फोट झाला होता. माहेरचे ‘स्तासिनोपोलू’ हे ग्रीक आडनाव आरियाना यांनी वापरण्याचे टाळले, ते कायमचेच!

‘एओएल’ या बडय़ा महाजाल कंपनीने २०११ मध्ये ‘हफिंग्टन पोस्ट’ विकत घेतले, तेव्हा या ‘वाऱ्यावरच्या वार्ता-वराती’ची किंमत होती ३१ कोटी ५० लाख डॉलर. मालकी पुन्हा बदलूनही संपादकपदी आरियानाच राहिल्या व ‘हफिंग्टन पोस्ट’ हे डावीकडे झुकलेले, ही ओळखही टिकली होती. आरियाना यांच्या निवृत्तीनंतर काय-काय बदलणार, याची चर्चा त्यामुळेच जोरात आहे.