जगातील सध्याच्या अव्वल बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या आर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियानची बुद्धिबळपटू पत्नी आरिआन काओली हिचा अपघाती मृत्यू बुद्धिबळ जगताला हादरवून सोडणारा ठरला. त्याहीपेक्षा दु:खद म्हणजे, बहुतेक प्रसारमाध्यमांच्या मथळ्यांमध्ये दिसून आलेली ‘लेव्हॉन अरोनियानची पत्नी’ इतकीच तिची मर्यादित ओळख तिच्या बहुपैलू व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारी ठरली. तिला अवघे ३४ वर्षांचे अल्प आयुष्य मिळाले. पण दीर्घ हयातीत इतरांना जमणार नाही अशी कामगिरी तिने करून दाखवली. ती मूळची फिलिपिन्सची. काही वर्षांनी तिचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी ती १६ वर्षांखालील आशियाई विजेती ठरली. ऑस्ट्रेलियात बुद्धिबळाव्यतिरिक्त इतर विशेषत: मैदानी खेळांसाठी पोषक वातावरण असूनही आरिआनने बुद्धिबळाची आवड जोपासली. तिच्या पहिल्या दोन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आरिआनने फिलिपिन्सचे प्रतिनिधित्व केले. मग पुढील पाच ऑलिम्पियाडमध्ये ती ऑस्ट्रेलियाकडून खेळली. केवळ बुद्धिबळावरच लक्ष केंद्रित केले असते, तर तिने थक्क करणारी प्रगती केली असती. आशियाई विजेती बनली त्या वर्षी म्हणजे सन २०००मध्ये आरिआनने माजी जगज्जेता अनातोली कारपॉवचा सहायक व्लादिमीर एपिशिन (हा स्वतही उत्तम बुद्धिबळपटू होताच) याला हरवून दाखवले होते. पण बुद्धिबळ तिच्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक पैलू होता. तिने अर्थशास्त्रात पीएच. डी. मिळवली. याशिवाय विविध भाषांमध्ये ती पारंगत होती. उत्तम नृत्यांगना होती. अरोनियानशी विवाह झाल्यानंतर ती आर्मेनियामध्ये स्थायिक झाली. तिथल्या मुलांच्या मदतीसाठी दोनच वर्षांपूर्वी तुर्कस्तान, इराण, आर्मेनिया असा २००० किलोमीटरचा सायकलप्रवास तिने केला. आर्मेनियात अनेक कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ आर्थिक सल्लागार म्हणून ती नियुक्त झाली होती. सार्वजनिक निधी वितरण आणि धोरण या क्षेत्रात ती आर्मेनियाच्या सरकारची सल्लागार होती. इतक्या व्यापातून ती कधीकधी अरोनियानबरोबर स्पर्धास्थळी उपस्थित राहायची. तिथेही अनेक विश्लेषणात्मक चर्चामध्ये सहभागी व्हायची. विश्वनाथन आनंद आणि त्याची पत्नी अरुणा यांच्याशी तिचा विशेष स्नेह होता. मूळचा फिलिपिन्सचा पण सध्या अमेरिकेकडून खेळणारा वेस्ली सो हा आणखी एक अव्वल बुद्धिबळपटू. त्याला प्रोत्साहन आरिआनकडूनच मिळाले. एका अव्वल बुद्धिबळपटूची पत्नी अशी मर्यादित ओळख चौकट कधीच भेदून आरिआन काओलीने स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळेच तिचे अकाली जाणे बुद्धिबळ विश्वाबाहेरीलही अनेकांसाठी क्लेशकारक ठरले.