एकदा एक मुस्लीम महिला एका लेखकाकडे आली व त्यांना तिची व्यथा सांगितली. तिचा विवाह पक्षाघात झालेल्या व्यक्तीशी अजाणतेपणाने झाला होता. तिला तलाक हवा होता, पण पती तो द्यायला तयार नव्हता, यावर तुम्ही कथा लिहा, असा हट्टच तिने त्यांच्याकडे धरला. त्यांच्या शब्दांची ताकद एवढी जबरदस्त आहे की, व्यथेची कथा केव्हा होऊन जाते हे कळतही नाही.. त्यांचे नाव जमालुद्दीन महंमद साली.

तामिळ लेखक असले तरी त्यांना इतरही काही भाषा चांगल्या येतात. मराठी, बंगाली, इंग्रजी, हिंदी भाषांतील पुस्तकांचे भाषांतर त्यांनी तामिळमध्ये केले आहे. लहानपणी त्यांना शेक्सपिअर व बर्नार्ड शॉ यांच्यावरचे पाठ वाचून लेखक व्हावेसे वाटले, विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय साहित्यात चमकदार कामगिरी करणारे ते भारतीय वंशाचे सिंगापूरमधील एकमेव नागरिक आहेत. त्यांना आग्नेय आशिया साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची ५७ पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी आहेत. भाषांतरकार म्हणूनही ते निपुण आहेत. त्यांनी ८० नाटके, ४०० लघुकथा लिहिल्या, त्यात ‘वेलाई कोडुगल’ (व्हाइट लाइन्स), ‘अलाइगल पेसुगिनरना’ (द साऊंड ऑफ द वेव्हज) ही पुस्तके विशेष गाजली. त्यांचा जन्म चेन्नईचा. त्यांच्यावर तामिळ लेखक कि. वा. जगन्नाथन यांचा प्रभाव आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातील पात्रांना संवादातून जिवंत केले. १९६०-६२च्या सुमारास त्यांनी साहित्यात एम.ए. केले. काही काळ त्यांनी चेन्नईत लेखापाल म्हणून काम केले होते. नंतर ते लेखनाकडे वळले. वयाच्या २५व्या वर्षी त्यांना ‘तामिळ मुरासू’ या वर्तमानपत्राचे संस्थापक जी. सारंगपाणी यांनी सिंगापूरमध्ये बोलावले व सहायक संपादक केले; पण त्याआधी आठ वष्रे नुसते बाजूला बसवून लेखन कसे करायचे, याचे सगळे बारकावे शिकवले. चांगले लेखक व्हायचे असेल तर तुम्ही आधी चांगले वाचक असला पाहिजेत व तुम्हाला मातृभाषा चांगली आली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या ‘पत्रुक कोडू’ (सपोर्ट) या कथेला ‘मुस्लीम मुरासू’ मासिकाचा पुरस्कार मिळाला, तर ‘वेलिचम’ (लाइट), ‘थरियिल विझुनथा मीन’ (फिश विच फेल ऑन द ग्राऊंड), ‘मकारनथम’ (पोलेन- परागकण), ‘अनुलाविन पडाकू’ (बोट ऑफ अनुला) या कथांना ‘आनंद विकटन’चे पुरस्कार मिळाले. त्यांच्या ‘कना कांदेन थोझी’ (फ्रेंड आय ड्रिम्ट) या पुस्तकाला तामिळनाडू सरकारचा उत्कृष्ट तामिळ कादंबरी पुरस्कारही मिळाला. आशियायी साहित्यावरील ‘अँथॉलॉजी ऑफ एशियन लिटरेचर’ या पुस्तकाच्या संपादकात त्यांचा समावेश आहे.