मुंबई पोलीस दलात आजही १९८३ च्या तुकडीचा बोलबाला आहे; तो या तुकडीतील अधिकाऱ्यांमुळे नव्हे, तर त्यावेळी नाशिक पोलीस अकादमीचे प्राचार्य असलेल्या अरविंद इनामदार यांच्यामुळे. पोलीस अकादमीत पोस्टिंग म्हणजे कमी महत्त्वाचे मानून बदली करून घेण्यासाठी आज तर चढाओढ लागते. पण इनामदार यांनी त्या काळात या अकादमीचे रूपडेच पालटून टाकले. लष्करी पद्धतीचे खडतर प्रशिक्षण उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू होणाऱ्यांना दिले. याचा परिणाम असा झाला की, ४०० जणांच्या तुकडीतील ७० जण नापास झाले. अकादमीच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. या ७० जणांना पुन्हा सहा महिने खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले. त्यातही पुन्हा काही जण नापास झाले. दोघा-तिघांना त्यांनी घरीच पाठवले. प्राचार्य इनामदार असेपर्यंत फक्त शिस्त आणि शिस्तच या अकादमीत होती. फक्त एवढेच नव्हे, तर अकादमीत मिळणाऱ्या जेवणाचा दर्जाही त्यांनी सुधारला आणि दरही कमी केले. अकादमीत मोठय़ा संख्येने आलेल्या ग्रामीण मुलांना जेवायचे कसे, बोलायचे कसे, कपडे कसे घालायचे, आदी धडे क्वचितच अकादमीत कधी मिळाले असावेत. त्यामुळेच १९८३ च्या तुकडीतील सारे अधिकारी इनामदार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. या काळात या भावी पोलिसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी अनेक नामवंत वक्त्यांना, साहित्यिकांना पाचारण केले. त्यातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध जुळला तो कायमचा. इनामदार यांच्या साहित्यिक जाणिवेची चुणूकही तेव्हाच दिसली. संस्कृत श्लोकाविना त्यांचे भाषण पूर्णच होत नसे.

१९९३ मध्ये मुंबईत दंगलीने कहर गाठला होता, तेव्हा तत्कालीन आयुक्त श्रीकांत बापट यांनी इनामदारांना मुंबईत बोलावून घेतले. त्याआधी विक्रोळीतील गोदरेज कंपनीतील दत्ता सामंतप्रणीत संपाच्या वेळी इनामदार यांच्यातील कणखर पोलिसाची चुणूक दिसली होतीच. गुन्हे अन्वेषण विभागाचे पहिले सहआयुक्त होण्याचा मान इनामदार यांच्याकडेच जातो. दगडी चाळीत शस्त्रास्त्रे सापडल्यानंतर अरुण गवळीवर ‘टाडा’अंतर्गत कारवाई करण्याचे श्रेय इनामदारांकडेच जाते. मुंबईचे पोलीस आयुक्त होण्याचे त्यांचे स्वप्न काही पुरे होऊ शकले नाही. त्यांना नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नेमले गेले. राज्याचे ते पोलीस महासंचालक झाले खरे; परंतु १९९९ मध्ये युती सरकार पायउतार झाल्यावर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारातील उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे पटले नाही. इनामदार यांची राज्याच्या पोलीस प्रमुखपदावरून पुण्यात विशेष पद निर्माण करून बदली केली गेली. आत्मसन्मान राखत इनामदार यांनी सेवेचे दीड वर्ष शिल्लक असतानाच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. कुठल्याच राजकीय दबावाला न जुमानणाऱ्या इनामदार यांना त्यामुळेच अनेकदा बदल्यांना सामोरे जावे लागले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांना केंद्र तसेच राज्य सरकारकडून बोलावणे आले; पण त्यांनी ते प्रस्ताव नाकारले. २००२ मध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे सुरक्षा सल्लागार हे पद त्यांनी स्वीकारले. पण ते अल्पमुदतीचे ठरले. पोलिसांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले काम स्पृहणीय होते. निवृत्तीनंतरही अरविंद इनामदार फाऊंडेशनच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत पोलिसांच्या कल्याणासाठी झटत राहिले. दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर मात्र ते खचले. त्यातून ते बाहेर आलेच नाहीत आणि त्यांनीच अखेर, ‘राम राम देवा’ हा आपला नेहमीचा नमस्कार करीत निरोप घेतला.

Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
sushma andhare marathi news, sushma andhare criticizes cm eknath shinde marathi news,
“पाच गद्दारांना धडा मिळाला, इतरांना जनता धडा शिकविणार”, सुषमा अंधारे यांची टीका; म्हणाल्या…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
MLA Praniti Shinde On BJP MLA Ram Satpute
“माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचे असेल तर…”, प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना खुले आव्हान