22 October 2019

News Flash

अ‍ॅश्ले बर्टी

वयाच्या २३ वर्षी तिने हा पराक्रम साकारून तब्बल ४६ वर्षांनी ऑस्ट्रेलियातर्फे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याचा बहुमान तिने मिळवला.

अॅयश्ले बर्टी

वयाच्या चौथ्या वर्षीच टेनिसची रॅकेट हातात घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बर्टीने शनिवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरून कारकीर्दीतील पहिलेवहिले महिला एकेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. वयाच्या २३ वर्षी तिने हा पराक्रम साकारून तब्बल ४६ वर्षांनी ऑस्ट्रेलियातर्फे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याचा बहुमान तिने मिळवला. मार्गारेट कोर्टने १९४६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. १९९६ मध्ये क्वीन्सलॅण्ड येथे जन्मलेल्या बर्टीने किशोरवयातच अनेक विजेतेपदांना गवसणी घातली. २०११चे विम्बल्डन, २०१३ मध्ये एटीपी टूर आणि त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवून तिने सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मात्र २०१४ मध्ये अचानक बर्टीने टेनिसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेत क्रिकेटकडे गाडी वळवली. ऑस्ट्रेलियातील महिलांच्या लोकप्रिय बिग बॅश लीगमध्ये तिची ब्रिस्बेन हिट या संघासाठी निवडसुद्धा करण्यात आली. मात्र हा निर्णय चुकल्याचे लक्षात आल्यावर २०१६ मध्ये बर्टीने टेनिसमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर प्रतिष्ठित चार ग्रॅण्डस्लॅमच्या महिला एकेरीचे विजेतेपद हुकत असले तरी दुहेरीत तिने कॅसी डेलाकोव्हासह सर्वाना नामोहरम केले. २०१७च्या फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही स्पर्धेतील महिला दुहेरीत तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, तर २०१८च्या अमेरिकन स्पर्धेत तिने जेतेपदाचे लक्ष्य साध्य केले. बर्टीच्या कारकीर्दीतील दुहेरीतील हे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद ठरले. यादरम्यान तिने मिश्र दुहेरीत २०१६च्या ऑस्ट्रेलियनमध्ये उपांत्यपूर्व फेरीतसुद्धा प्रवेश केला होता.२०१९ हे वर्ष मात्र बर्टीसाठी अद्याप तरी यशदायी ठरत आहे. वर्षांच्या सुरुवातीस तिने मियामी टेनिस स्पर्धेच्या विजेतेपद जिंकले, तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. त्याचप्रमाणे महिलांच्या फेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना बर्टीने अंतिम फेरी गाठली असून वर्षांच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यांचा फ्रान्सशी मुकाबला होईल. वर्षभरात दमदार कामगिरी केल्यानंतरही बर्टीने विश्रांती घेतली नाही. यंदाच्या फ्रेंच स्पर्धेला सुरुवात होताच आठव्या मानांकित बर्टीने आपल्यापेक्षा क्रमवारीत वरच्या स्थानी असलेल्या खेळाडूंना धक्के देण्यास सुरुवात केली. अंतिम फेरीत मार्केटा व्होंड्रोसोव्हाला ६-१, ६-३ अशी धूळ चारून तिने अजिंक्यपद मिळवले. या ऐतिहासिक यशामुळे तिने महिलांच्या जागतिक टेनिस क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानी झेप तर घेतलीच.. आणि  टेनिसला नव्या तारकेचा शोध लागला.

First Published on June 11, 2019 12:09 am

Web Title: ashleigh barty profile