07 December 2019

News Flash

डॉ. अशोक कुकडे

व्यक्तिगत फायद्याचा विचार न करता सारे आयुष्य देशासाठी, समाजासाठी देण्याच्या भावनेतून अव्याहतपणे काही जण काम करतात.

व्यक्तिगत फायद्याचा विचार न करता सारे आयुष्य देशासाठी, समाजासाठी देण्याच्या भावनेतून अव्याहतपणे काही जण काम करतात. समाजाचे कल्याण व्हावे, हीच भावना त्यामागे असते. पुण्यासारख्या शहरात वैद्यकीय व्यवसायातून भरपूर पैसे मिळवण्याची संधी असूनही लातूर हे कार्यक्षेत्र निवडून तेथे विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान उभे करण्यात डॉ. अशोक कुकडे यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कुकडे परिवारात काका कुकडे या नावाने ओळखले जातात. त्यांच्या या योगदानाबद्दल केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे.

कुकडे यांचे वडील पुणे व परिसरात उत्तम डॉक्टर म्हणून परिचित होते. वैद्यकीय सेवेचा वारसा त्यांच्याकडूनच काकांकडे आला. एमबीबीएसला १९६२ मध्ये बीजे मेडिकलमध्ये पुणे विद्यापीठात ते प्रथम आले. पुढे एमएस केले. निष्णात शल्यविशारद म्हणून शहरात त्यांना मोठी अर्थप्राप्ती करता आली असती, मात्र त्यांनी व त्यांच्या समवयस्क मित्रांनी ग्रामीण भागांत काम उभे करण्याचा निर्णय घेतला. मिरजमध्ये पाठय़वृत्ती (इंटर्नशिप) करत असताना भूलतज्ज्ञ राजाभाऊ अलूरकर यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्यातून मग कामाची दिशा निश्चित झाली. संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव केतकर मराठवाडय़ात कार्यरत होते. या भागात वैद्यकीय सेवेची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. मग ४ जानेवारी १९६६ पासून लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालय स्थापन झाले.

आणीबाणीच्या कालखंडात कुकडे स्थानबद्ध होते. आणीबाणी संपल्यावर पुन्हा हे काम जोमाने सुरू झाले. समाज, रुग्ण व वैद्यकीय पेशा यांबाबत प्रामाणिक राहण्याचे व्रत त्यांनी कायम जोपासल्यामुळे हे काम उभे राहिले. वेळेच्या बाबतीतही ते काटेकोर आहेत. जेमतेम आठ ते नऊ खोल्यांमध्ये व पाच कर्मचाऱ्यांच्या बळावर विवेकानंद रुग्णालयाचे काम सुरू झाले. काका व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्तिगत लाभ बाजूला ठेवून हे काम उभे केले. सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित व्हावेत म्हणून संचालकांनी कमी वेतन घेण्याचा निर्णय घेतला. १९९३च्या किल्लारीच्या भूकंपातही वर्षभर मोफत वैद्यकीय सेवा पुरविली, त्यांचे पुनर्वसन केले. केवळ रुग्णालयच नव्हे तर २०१६ मध्ये दुष्काळात रा. स्व. संघाच्याच जनकल्याण समितीमार्फत कुकडे यांनी जलसंधारणाचे कामही उभे केले आहे. त्यांच्या या वाटचालीत पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना यांनी तितकीच मोलाची साथ दिली. पद्म पुरस्कार देऊन सरकारने समाजासाठी झटणाऱ्या निरलस महाराष्ट्रीय कार्यकर्त्यांचा गौरव केला आहे.

First Published on February 8, 2019 1:35 am

Web Title: ashok kukade
Just Now!
X