News Flash

अशोक लवासा

केंद्रात गृह, अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार ही खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

केंद्रात गृह, अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार ही खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या पदांवर निवड करताना गुणवत्तेबरोबरच ती व्यक्ती पंतप्रधानांच्या विश्वासातील असणेही तितकेच महत्त्वाचे असते. या खात्याचे सचिव नेमतानाही मग विचारपूर्वक निर्णय घेतला जातो. मुदतवाढ मिळाल्यानंतर अर्थसचिव रतन वाटल एप्रिलमध्ये निवृत्त झाले. त्यानंतर दीड महिन्यांनी अर्थसचिव म्हणून हरयाणा केडरचे १९८० च्या तुकडीतील वरिष्ठ सनदी अधिकारी अशोक लवासा यांच्या नावाला मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आणि सोमवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
अर्थसंकल्पाबरोबरच देशाच्या आर्थिक विकासासंबंधी धोरणे आखण्याची जबाबदारी अर्थखात्यावर असल्याने देशभरातील नामांकित सनदी अधिकाऱ्यांची अर्थखात्यात नियुक्ती केली जाते. अशोक लवासा, शक्तिकांत दास, हसमुख अधिया, अंजुली छिब दुग्गल आणि नीरजकुमार गुप्ता हे सचिव दर्जाचे पाच अधिकारी अर्थखात्यात आहेत. त्यातील लवासा आणि दास हे दोन्ही अधिकारी १९८० च्याच तुकडीतील आहेत. मग यूपीएससीच्या परीक्षेतील लवासा यांचा गुणवत्ता क्रमांक (रँक), त्यांचे वय आणि पर्यावरण, नागरी हवाई वाहतूक या खात्यांत त्यांनी बजावलेली चमकदार कामगिरी ध्यानात घेऊन त्यांची अर्थसचिवपदी निवड केली गेली.
२१ ऑक्टोबर १९५७ रोजी जन्मलेल्या लवासा यांचे शालेय शिक्षण बेळगावच्या मिलिटरी स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनातच त्यांना साहित्यात गोडी निर्माण झाली. बी.ए.ला मग त्यांनी आवर्जून इंग्रजी साहित्य हा विषय घेतला. वडिलांची बदली झाल्याने ते नंतर दिल्लीत आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले. काही काळ त्यांनी अध्यापन केले. नंतर ते स्टेट बँकेत होते. मित्रांच्या आग्रहामुळे यूपीएससीच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वीही झाले आणि त्यांना हरयाणा केडर मिळाले. राज्यात विविध पदे भूषवल्यानंतर लवासा केंद्रात आले. ऊर्जा, नागरी हवाई वाहतूक यांसारख्या खात्यांतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सप्टेंबर २०१४ मध्ये ते पर्यावरण सचिव बनले. तेथील लालफितीचा कारभार त्यांनी मोडून काढला. राज्य सरकारे वा खासगी उद्योगांना कोणत्याही प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळवताना नाकीनऊ येत असे. लवासा यांनी खात्यात पारदर्शकता तर आणलीच, पण प्रकल्पांना मंजुरी मिळण्याचा कालावधी ६०० दिवसांवरून १९० दिवसांवर आणला. प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांनाही त्यांनी चांगला चाप लावला. त्यांचे पूर्वसुरी वाटल हे माध्यमस्नेही नव्हते, असा आक्षेप घेतला जात असे. ‘आपला फोन माध्यम प्रतिनिधींसाठी सदैव सुरूच असेल’ असे सूचक उद्गार त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काढले. निसर्गप्रेमी असलेल्या लवासा यांना छायाचित्रणाची विशेष आवड असून काही शहरांत त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही भरली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 3:05 am

Web Title: ashok lavasa
Next Stories
1 डी. जावरे गौडा
2 प्रा. मुकुंद घैसास
3 डॉ. अर्णब डे
Just Now!
X