मराठी नाटकांचा बहराचा आणि १९७० च्या दशकातील काहीशा उताराचा काळ पाहिलेल्या अभिनेत्री ललिता देसाई ऊर्फ ‘आशू’ यांची निधनवार्ता दोन दिवसांपूर्वी आली, तीही त्रोटक. या अभिनेत्रीने मराठी नाटकांबरोबरच हिंदी चित्रपटांचाही १९९० पर्यंतचा काळ जवळून पाहिला होता आणि आचार्य अत्रे, राजा परांजपे यांसारख्या मराठीतील वजनदार लेखक, दिग्दर्शकांपासून ते राजेश खन्नार्पयच्या अभिनेत्यांसह काम केले होते, याची दखल फार कुणी घेतली नाही आणि पुन्हा अभिनयाचे, ‘ग्लॅमर’ वगैरे म्हणवले जाणारे क्षेत्र किती क्षणभंगुर आहे, याचीच प्रचीती आली. अनेक मराठी कलावंतांनी उतारवयात आत्मचरित्रे वा आठवणी लिहिल्या आहेत, तसे आशू यांनी केलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या काळाची जी वेगळी वैशिष्टय़े त्यांनी अनुभवली, तीही पोहोचणे कठीण.

‘आशू’ हे  नाव त्यांना मिळण्यापूर्वीही पाच-सहा वर्षे त्या नाटय़क्षेत्रात होत्या. ललिता देसाई या नावानेच वावरत होत्या. आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ मध्ये १९६४  साली रश्मीची आणि ‘ब्रह्मचारी’ या नाटकात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या या तरुण अभिनेत्रीला खुद्द अत्रे ‘चारुगात्री ललिता’ म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’नाटकातील ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता’ या गाण्याच्या दृश्यासाठी खास लंडनहून पोहण्याचा पोशाख आणवला होता, अशी आठवण आशू सांगत. अत्रे यांची निखळ मनोरंजक नाटके, हा त्यांच्या नाटय़कारकीर्दीचा पहिला चरण होता. तर ‘जंगली कबूतर’, ‘गुंतता हृदय हे’ तसेच ‘नाथ हा माझा’ ही काहीशी समस्याप्रधान नाटके, हा दुसरा टप्पा.

परंतु अभिनयाच्या क्षेत्रातील कोणालाही व्हावा, तसे हिंदी चित्रपटसृष्टीचा मोह त्यांना पडला.  अर्जुन  हिंगोरानी यांच्या ‘कब क्यूं और कहाँ’ मध्ये धर्मेद्रची नायिका बबिता असली, तरी रीटा आणि लता या दोन सहनायिकांची पात्रे त्यात होती. यापैकी रीटा होत्या हेलन, तर लता म्हणजे आशू. ‘आशू’ हे नाव राजकपूर यांच्या पत्नी आणि पुढे बबिता यांच्या सासूबाई झालेल्या कृष्णा कपूर यांनी निवडले, असे सांगितले जाते. या चित्रपटानंतर आशू यांना दुय्यम भूमिकाच अधिक मिळत गेल्या. ‘बायकोचा भाऊ’ या मराठी चित्रपटातही महत्त्वाची भूमिका त्यांची नव्हती, तेव्हापासून मराठी चित्रपटांतही तोच पाढा. पण नाटय़कलाकाराला सहकलावंत, तंत्रज्ञ यांच्याविषयी आत्मीयता असते, ती आशू यांनी सिनेक्षेत्रातही जपली. अनेकांना मदतही केली.

याच काळात सुरू झाला, तो आशू यांच्या कारकीर्दीचा तिसरा टप्पा. सवंग प्रसिद्धी करून, ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’ म्हणून खपवली गेलेली ही नाटके होती. चांगल्या संहिता आणि प्रयोगांचे चांगले उत्पन्न यांचे गणित चुकत असताना या नाटकांची लाटच आली. मधाळ आवाजात बोलण्याची शैली,  मादक अभिनेत्री म्हणून साजेसे दिसणे, या बळावर आशू यांनी या भूमिका केल्या. त्यातच एका मुलाखतीदरम्यान केलेले ‘संहितेची गरज आणि प्रेक्षकांची मागणी असेल तर..’ हे विधान वादग्रस्त ठरले. ती लाट ओसरल्यावर ललिता त्रेहान (माहेरच्या देसाई) संसारातच अधिक रमल्या.