कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरल्यानंतर कधी तरी विक्रमवीर सुनील गावस्कर यांना विचारण्यात आले, की तुमचा हा विक्रम कोणी मोडू शकेल असे वाटते का? गावस्कर उत्तरले, ‘एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर करणारे म्हणून हिलरी आणि तेन्सिंग यांचीच नावे लक्षात राहतील!’ एक मैल अंतर चार मिनिटांच्या आत पहिल्यांदा पूर्ण करणारे धावपटू सर रॉजर बॅनिस्टर यांच्या बाबतीतही असेच काहीसे म्हणता येईल. गावस्कर, हिलरी-तेन्सिंग किंवा जिम हाइन्स (१० सेकंदांच्या आत १०० मीटर धावणारा पहिला धावपटू) यांच्याप्रमाणेच बॅनिस्टरही आपल्या कर्तृत्व क्षेत्रातले आद्यवीर.

६ मे १९५४च्या एका पावसाळी सकाळी बॅनिस्टर यांनी वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी म्हणून लंडनच्या सेंट मेरिज हॉस्पिटलमध्ये आपली नेहमीची कामे उरकली. दुपारच्या गाडीने ऑक्सफर्ड गाठले. मित्रांसमवेत भोजन घेतले. तेथून इफ्ली रोड ट्रॅकवर ते दोन मित्रांसह गेले. बॅनिस्टर हौशी अ‍ॅथलीट होते आणि त्या काळात अ‍ॅथलेटिक्सप्रेमींचे आणि स्पर्धकांचे मुख्य आकर्षण असलेल्या एक मैल शर्यतीत आवर्जून भाग घ्यायचे. त्या काळात मैलभर अंतर चार मिनिटांच्या आत पळून दाखवण्याचे आव्हान अ‍ॅथलेटिक्स समुदायातील अनेकांना खुणवायचे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच त्यांनी धावण्याच्या स्पर्धामध्येही भाग घ्यायला सुरुवात केली होती. १९४८मध्ये त्यांना लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याविषयी ‘विचारणा’ करण्यात आली. पण तयारी पुरेशी नसल्याने त्यांनी नकार दिला. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ते चौथे आले. हा प्रकार मैलभर धावण्याच्या (१६०९ मीटर्स) सर्वाधिक जवळ जाणारा. या अपयशाने खचून न जाता बॅनिस्टर यांनी अथक प्रशिक्षण सुरूच ठेवले. अखेरीस त्यांना १९५४मध्ये यश आले. ६ मे रोजी ऑक्सफर्डमधील त्या दुपारी त्यांनी १ मैल अंतर ३ मिनिट ५९.४ सेकंदांमध्ये पार केले. धावण्याच्या ज्ञात आणि नोंदणीकृत इतिहासातील हे पहिले आणि महत्त्वाचे पाऊल ठरले. हा विक्रम अवघ्या ४६ दिवसांनी जॉन लॅण्डी या ऑस्ट्रेलियन धावकाने विक्रम मोडला. पुढे सॅबेस्टियन को, स्टीव्ह क्रॅम, स्टीव्ह ओवेट या ब्रिटिश धावकांनी या शर्यत प्रकारात अनेक पारितोषिके जिंकली.

खुद्द बॅनिस्टर यांनी अ‍ॅथलेटिक्स सोडून वैद्यकीय व्यवसायाला प्राधान्य दिले. चेताविकारतज्ज्ञ म्हणून ते अधिक नावारूपाला आले. पण ‘वन माइल अंडर फोर’ हा बहुमान त्यांच्या हयातीत त्यांचाच राहिला आणि आता त्यांच्या पश्चात बॅनिस्टर या नावाशीच निगडित राहील.