गेली सहा दशके तमिळमध्ये स्त्रीवादी लिखाणाचा गडद ठसा उमटवलेल्या आणि पुढे त्याच्या अनुवादातून इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतील वाचकांचेही लक्ष वेधून घेणाऱ्या ज्येष्ठ तमिळ लेखिका अम्बई यांना अलीकडचे उटी साहित्य महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्तरच्या दशकात मराठीप्रमाणेच काही भारतीय भाषांनी अनुभवलेला लघु-नियतकालिकांच्या चळवळीचा धडाका तमिळ भाषेनेही पाहिला. त्या घुसळणीतून अभिव्यक्तीच्या नव्या शक्यता अजमावल्या गेल्याच; परंतु नवीन मूल्यांचा आणि दडपल्या गेलेल्या घटकांचा आवाजही बुलंद झाला. तमिळमध्ये या काळात जुनाट मूल्यांविरुद्ध धडाडीने लिहिणाऱ्या ‘बंडखोर लेखकां’मध्ये अम्बई यांचा समावेश होतो.

१९४४ साली कोइम्बतूर येथे जन्मलेल्या सी. एस. लक्ष्मी यांनी बालपणाचा काही काळ मुंबईत घालवल्यानंतर पुढे पदव्युत्तर शिक्षणापर्यंत त्या बंगळूरुमध्ये होत्या. तिथल्या मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये एमए केल्यानंतर १९६९ साली त्यांनी इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज् या आता दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात विलीन झालेल्या संस्थेतून ‘अमेरिकन स्टडीज्’ या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली आणि पुढील सारे आयुष्य अकादमिक कारकीर्द आणि स्त्रीविषयक अर्काइव्हज् यांना वाहून घेतले, ते आजतागायत. परंतु त्याही आधीपासून, पुढे या साऱ्यास समांतरपणे त्यांची लेखन कारकीर्द सुरूच आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पहिली कथा लिहिली. त्यानंतर काही काळातच त्यांची पहिली कादंबरी- ‘नंदीमलाइ चारलिले’- प्रसिद्ध झाली. ही कादंबरी लिहिताना सी. एस. लक्ष्मी यांनी ‘अम्बई’ हे नाव धारण केले आणि पुढे याच नावाने त्या सर्जनशील लेखन करू लागल्या. त्यानंतर आलेल्या त्यांच्या ‘अंधीमलाइ’ या कादंबरीपर्यंत त्यांच्या लेखनात पारंपरिक शैली-विषयांची झाक दिसत असली तरी अम्बईंनी पुढील काळात मात्र गंभीरपणे स्त्रीप्रश्नांना वाचा फोडणारे लेखन सर्जनशीलपणे केले. ‘श्रीरागुगल मरियम’ (‘विंग्ज गेट ब्रोकन’) या १९७६ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कादंबरीपासून याची सुरुवात झाली; ‘कातील ओरु मान’, ‘वरुम इरियीन मींगल’ या त्यांच्या इतर पुस्तकांतूनही त्याची प्रचीती येते.

याशिवाय अम्बई यांनी वास्तववादाकडे झुकलेल्या लघुकथा लिहिल्याच, शिवाय गुंतागुंतीचे कथानक असलेल्या, प्रतीकात्मक आशयाच्या कथाही वाचकांहाती दिल्या. त्यासाठी कथनाचे विविध घाट, रूपबंध त्यांनी योजलेच; पण ते करताना मूळ विचार- स्त्रीप्रश्नांना वाचा फोडणे- याचा कधीही विसर पडू दिला नाही. त्यांचे हे लेखन यशस्वी ठरले. त्यात भाषेची जाण आणि तिच्या वापराचे व्यापक भान उपयोगी पडते, अशी अम्बई यांची धारणा आहे. ती त्यांनी तमिळ लेखिकांच्या साहित्याबद्दल लिहिलेल्या ‘द फेस बीहाइंड द मास्क’ या पुस्तकातही मांडली आहे. स्त्री-प्रश्नांविषयी त्यांनी अकादमिक आणि दस्तावेजीकरण करणारे लेखनही केले आहे. स्त्री-अभ्यासशाखेसाठी संशोधनात्मक दस्तावेजीकरण करणाऱ्या ‘स्पॅरो’ या संस्थेच्या संस्थापक या नात्याने अम्बई यांनी गेली तीनेक दशके त्या कामात स्वत:स झोकून दिले आहे.