28 November 2020

News Flash

ज्युडिथ केर

ज्युडिथ यांची बालकथा मालिका मात्र एका विसराळू मनीमाऊबद्दल होती.

ज्युडिथ केर

‘मुलं वाचत नाहीत हो.. त्यांना फक्त बघायचंच असतं’ – अशा प्रकारची तक्रार मोबाइल- संगणकाच्या जमान्यात घरोघरी होऊ लागली, त्याच्या किती तरी आधीच, म्हणजे १९६८ साली एका ब्रिटिश लेखिकेने ते ओळखले होते. ज्युडिथ केर हे या लेखिकेचे नाव. ‘द टायगर हू केम टु डिनर’ हे आजही खपणारे बालपुस्तक त्यांनी फक्त लिहिलेच नाही तर त्यातील चित्रेसुद्धा काढली. हे पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, पुढल्या अर्धशतकभरात अवघी ३० बालपुस्तके ज्युडिथ यांनी लिहिली-चितारली. ती सारीच गाजली आणि त्यांचे ३१ वे पुस्तक येत्या जूनमध्ये प्रकाशित होणार, त्याआधीच वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला.

ज्युडिथ केर होत्या ९५ वर्षांच्या. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाआधीच्या काळात त्यांचे बालपण गेले. मूळचे हे कुटुंब जर्मन ज्यू. वडील बर्लिनमध्ये नाटय़ समीक्षक होते; पण हिटलरचा वरवंटा जर्मनीभर ज्यूंवर फिरणार, हे लक्षात आल्यावर या कुटुंबाने इंग्लंडमध्ये स्थलांतर केले, तेव्हा ज्युडिथ १३ वर्षांच्या होत्या. तीन-चार वर्षांतच त्या उत्तम इंग्रजी बोलू लागल्या आणि दुसऱ्या महायुद्धकाळात रेड क्रॉस संघटनेचे काम करताना त्यांना सचिवपदापर्यंत बढतीही मिळाली. युद्धोत्तर काळात एका प्राथमिक शाळेत चित्रकला शिक्षिकेची नोकरी त्यांनी पत्करली.ही नैमित्तिक लिखाणकामे करीत सन १९५४ पासून संसारातच रमलेल्या ज्युडिथ ‘लेखिका’ म्हणून तशा उशिराच परिचित झाल्या. वयाच्या ४५ व्या वर्षी पहिले पुस्तक आले, ते ‘टायगर हू केम टु टी’! या गोष्टीतली मुलगी तिच्या आईसह राहत असते. एके दिवशी दार उघडते तर समोर वाघ.. ‘सहज चहाला आलोय’ म्हणतो आणि घरात छान गप्पा मारता मारता ‘वाघोबा’ होऊन जातो. पाश्चात्त्य मुलांवर वसाहतोत्तर काळातील जाणिवांचा संस्कार करणारे आणि सभ्यपणा कुणातही असू शकतो, याचा संस्कार करणारे हे पुस्तक ‘हार्पर कॉलिन्स’ने प्रकाशित केले, त्याची ‘सुवर्णजयंती आवृत्ती’ निघाली आहे.

ज्युडिथ यांची बालकथा मालिका मात्र एका विसराळू मनीमाऊबद्दल होती. मॉग हे या मांजरीचे नाव. ही मॉग म्हणजे ज्युडिथ यांच्या पुढील अनेक पुस्तकांची नायिकाच ठरली. मॉगच्या या कथा ‘सहा ते साठ वयाच्या सर्व मुलींमध्ये’ लोकप्रिय आहेत, असे गमतीने म्हटले जाई.

‘जे चित्रात आहेच, ते मुलांना चटकन कळते.. चित्रामधून जे समजेल, ते मी शब्दांमध्ये पुन्हा लिहीत नाही. एरवीही, कमीत कमी शब्द वापरते.’ अशा शब्दांत ज्युडिथ यांनी आपल्या यशाचे गमक मांडले होते. मात्र ‘मला चित्रे काढायला खूप वेळ लागतो.. चितारणे कमी आणि माझी खाडाखोड अधिक!’ हे सांगण्याचा विनयही त्यांच्याकडे होता. त्यांच्या हयातीतच, साऊथ लंडनमधील एका शाळेला त्यांचे नाव देण्यात आले. ‘ब्रिटिश बुक अ‍ॅवॉर्ड’खेरीज अन्य पुरस्कारांनी मात्र त्यांना हुलकावणीच दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 4:47 am

Web Title: author judith kerr profile
Next Stories
1 मायकेल जी. रॉसमन
2 हीरालाल यादव
3 बॉब हॉक
Just Now!
X