मलेशियातील, भारतीय वंशाचे, मूळचे तमिळ भाषक ही सारी विशेषणे मागे पडून के. एस. मणियम हे ‘इंग्रजीतील महत्त्वाचे लेखक’ ठरले, ते त्यांच्या कादंबऱ्या आणि अनेक कथांमुळे. लेखनगुणांमुळे त्यांना महत्त्व मिळाले हे खरे असले, तरी हे गुण बहरले ते त्यांच्या समाजविषयक भूमिकेतूनच. मलेशियातील सामाजिक घडामोडींबद्दल त्यांचे भाष्य गांभीर्याने ऐकले जाई. ‘मलेशियातील लेखकांपैकी ज्यांच्यावर सर्वाधिक साहित्य-अभ्यास झाले आहेत असे लेखक’ हा त्यांचा लौकिक होता, तो याच समाजाभिमुखतेमुळे. अशा सर्वार्थाने ज्येष्ठ लेखकाचे देहावसान १९ फेब्रुवारी रोजी झाल्याची बातमी भारतात मात्र उशिराच पोहोचली. भारतात त्यांच्या साहित्यकृतींची दखल कमीच घेतली गेली, परंतु दक्षिण आशियाई लेखकांना दिला जाणारा पहिला ‘राजा राव पुरस्कार’ (२०००) के. एस. मणियम यांना मिळाला होता.

मणियम हे मलेशियातच १९४२ साली जन्मले. आदल्या शतकात, त्यांचे आजोबा चहामळ्यातील मजूर म्हणून तेथे आणवले गेले होते. मणियम इंग्रजी शाळेत गेले. त्यांची ग्रहणक्षमता पाहून त्यांना इंग्रजीच्या अध्यापनाचे दोन वर्षांचे प्रशिक्षण इंग्लंडमध्ये घेण्यासाठी ब्रिटिश शिष्यवृत्तीही मिळाली. याच काळात ते लिहू लागले आणि पुढे, १९७०च्या दशकात क्वालालुंपूरच्या विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर, १९७९ पासून विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक झाले.

इंग्रजी शिक्षणाचा सर्रास प्रसार झाला नसताना आणि मलेशियाच्या स्वातंत्र्याची पहाट (१९५७) अद्याप उजाडायची असताना तो शिक्षणसंस्कार होणे कसे आयुष्य बदलणारेच ठरले, यावर त्यांची ‘द रिटर्न’ (१९६४) ही पहिली कादंबरी आधारलेली आहे. तिच्या किशोरवयीन नायकावर पाश्चात्त्य संस्कार होणे हेच प्रगतीचे लक्षण, असे नायकाचे वडील समजत असतात; परंतु नायकाचे विचारही प्रगत होऊन, तो जन्मभूमीस परततो, अशा कथानकातून मणियम यांनी ‘मी कोण? मी कुणाचा?’ हे प्रश्न सोडविले होते. पुढल्या ‘इन अ फार कंट्री’ या कादंबरीत ‘इथे माझे काय आहे?’ हा प्रश्न विवेकीपणे हाताळला आहे. या कादंबरीत एक चिनी पात्र, मलेशियात राहूनही चीनमध्ये असल्यासारखेच जगू पाहाते. जमीन खरेदीच्या व्यवसायातच असलेला नायक मात्र तसे करीत नाही. जमिनीशी, देशाशी नाते जुळते ते केवळ भौतिक मालकीने नव्हे तर माणसांशी लिप्ताळे (अनुबंध) किती आहे यातून, हा साक्षात्कार नायकाला होतो. ‘बिट्वीन लाइन्स’ या कादंबरीत पुन्हा जमीन मालकीचा विषय येतो. सरकारला जमीन देण्यास नकार देणारी तमिळ वृद्धा आणि तिचे मन वळवू पाहणाऱ्या तिघी- त्यापैकी एक चिनी, दुसरी मलाय आणि तिसरी तमिळ, असे जणू रूपकात्मक कथानक त्यात आहे. मलेशियात तमिळ हे अल्पसंख्य (१० टक्के). त्या वर्गास ‘हा देश आपलाही आहे’ हे भान मणियम यांनी दिले. सरकारने मात्र त्यांना महत्त्वाच्या पुरस्कारांपासून दूरच ठेवले, उलट हल्लीच (२०१८-१९) ‘ते मलेशियात राहात नाहीत, परदेशी गेले’ अशी नोंद मलेशियन सांस्कृतिक खात्याच्या सर्वेक्षणात झाली आणि एकच गदारोळ उठला! स्वत: मणियम या साहित्यिक राजकारणापासून दूर असत. त्याऐवजी वाढती मद्यपान समस्या, ‘झटपट पैशा’साठी वाढत असलेली गुंडगिरी, या सामाजिक समस्यांविषयी ते मुलाखतींमधून बोलत. त्यांच्या निधनाने, समाजभाव जपणाऱ्या एका वडीलधाऱ्या लेखकास आपण मुकलो आहोत.