25 March 2019

News Flash

मनोहर तल्हार

मनोहर तल्हार यांच्या निधनाने साठोत्तरी काळातील एक महत्त्वाचा कादंबरीकार मराठीने गमावला आहे.

मनोहर तल्हार यांच्या निधनाने साठोत्तरी काळातील एक महत्त्वाचा कादंबरीकार मराठीने गमावला आहे. ग्रामीण व मुख्यत्वे वऱ्हाडी भाषेत लेखन करणारे तल्हार शेवटपर्यंत ‘माणूस’कार म्हणून ओळखले गेले. या कादंबरीची कथा तशी दोन मित्रांची. त्यातला एक रिक्षावाला. ‘अमरावतीचे मराठीचे प्राध्यापक मधुकर तायडे यांच्याशी असलेल्या मैत्रीतून ही कादंबरी सुचली,’ असे तल्हार सांगायचे. वास्तववादाच्या अगदी जवळ जाणारी ही कादंबरी मराठी साहित्यात भरपूर गाजली. चंद्रकांत कुळकर्णीसारख्या दिग्दर्शकाला त्यावर दूरचित्रवाणी मालिका काढाविशी वाटली. या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला व तल्हारांना साहित्यिक म्हणून ओळख मिळाली.

साठच्या दशकात उद्धव शेळके, सुरेश भट, मधुकर केचे, राम शेवाळकर हे सारे अमरावती परिसरात राहणारे साहित्यिक कसदार लेखनासाठी ओळखले जाऊ लागले होते. त्यात तल्हारांचाही समावेश होता. तल्हार केवळ एका कादंबरीवर थांबले नाही. ‘प्रिया’, ‘अशरीरी’, ‘शुक्रथेंब’ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. वऱ्हाडी भाषेतील त्यांचे कथासंग्रहदेखील भरपूर आहेत. त्यात ‘बुढीचं खाटलं’, ‘निसंग’, ‘गोरीमोरी’, ‘दुजा शोक वाहे’, ‘दूरान्वय’ या संग्रहांचा समावेश आहे. ते मूळचे अमरावतीचेच. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. विक्रीकर खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागल्यावर त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नंतर ते याच खात्यात अधिकारी झाले. चित्रपट समीक्षा लिहिण्यापासून लेखनाला सुरुवात करणारे तल्हार नंतर नागपूरला आले; पण येथील साहित्यविश्वाने त्यांची उपेक्षाच केली.

लेखनातून सामाजिक प्रश्न हाताळण्याला प्राधान्य देणाऱ्या तल्हारांवर रशियन कथाकार आंतोन चेकॉव्हचा प्रभाव होता. मात्र त्यांच्या कथांचा शेवट मोपासांसारखा धक्कादायक असायचा. संवादी शैलीतील कथा हे त्यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्टय़. ‘माणूस’ला रसिकाश्रय मिळाला तरी स्वत: तल्हारांना त्यांनी लिहिलेली पहिली कथा ‘बायजा’ अधिक आवडायची. वऱ्हाडी भाषेचे सौंदर्य व ताकद वाढवण्यात अनेक साहित्यिकांनी त्या काळात पुढाकार घेतला. त्यात तल्हारांचे स्थान अगदी वरचे होते. अंभोरा येथे झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तल्हारांनी भूषवले. नंतर वऱ्हाडी बोली व भाषेची महती सांगणाऱ्या अनेक कार्यक्रमांत ते सहभागी व्हायचे. मात्र, लेखक म्हणून पुढेपुढे करणे, सरकारी सन्मान मिळवण्यासाठी धडपड करणे, प्रसिद्धीसाठी फिरणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळे साहित्यविश्वातल्या घडामोडींपासून ते कायम दूर राहिले. त्यांच्या लेखनाचा ग्रामीण बाज अधिक सच्चा होता. अखेरच्या काळात त्यांना कवितेचा छंद जडला होता. आठ महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर ते बरेच खचले होते. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वास्तववादाच्या दिशा अधिक व्यापक करणारे लेखन करणारा महत्त्वाचा ‘माणूस’ साहित्यवर्तुळाने गमावला आहे.

First Published on February 17, 2018 3:02 am

Web Title: author manohar talhar profile