रूढार्थाने कोणतीही पदवी न घेता वेदांसह अनेक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करून त्यांचे सटीक अर्थ सांगणारी, भाष्य करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलीच; शिवाय संस्कृत वाङ्मयही मातृभाषेत यावे म्हणून अनुवादकार्य केले. अशा प्रकारे, सुमारे १५० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार वाङ्मयीन भाषांतरासाठी; तर ‘पद्मश्री’ (२०१५) पारंपरिक भारतीय ज्ञान टिकवून ठेवण्याच्या कार्यासाठी, अशा सन्मानांनी त्यांच्या या दुहेरी कार्याचा गौरवही झाला होता. या पुरस्कारांपेक्षाही, मध्वाचार्याच्या ‘सर्वमूल ग्रंथां’च्या जीर्ण पोथीचे संगणकीकृत प्रतिमांकन केल्याचे समाधान त्यांना अधिक वाटे. कृतार्थपणेच वयाच्या ८५ व्या वर्षी, १३ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गतकाळाचे ग्रंथवैभव वडिलांनी- ‘तर्ककेसरी’ एस. नारायणाचार्य यांनी अवगत करून दिल्यानंतर अनेक मठांत गोविंदाचार्य शिकले. त्यांच्या नावातील ‘बी.’ हे अक्षर उडिपी जिल्ह्य़ातील बाणंजी या जन्मगावापासून आलेले. पुढे उडिपी शहराजवळच अम्बळपाडि भागात ते राहू लागले. या कौलारू, पण अत्यंत सुसज्ज घरातच परदेशी तज्ज्ञांच्या साहाय्याने मध्वाचार्य-रचित ग्रंथाच्या प्रतिमांकनाचे काम झाले. एका अपघातामुळे गेली काही वर्षे ते या घरापासून दूर जाऊ शकत नसत, पण तरुणपणी हस्तलिखिते मिळवण्यासाठी खूप फिरले आणि मध्यमवयात लिखाणही विविध प्रकारचे केले. मध्वाचार्य हे ‘द्वैत’ तत्त्वज्ञान मांडणारे, तेराव्या शतकातील विद्वान. त्यांच्या शिष्यत्वाची पिढीजात परंपरा जरी गोविंदाचार्याना आयती मिळाली असली, तरी तेथेच अडकून न पडता शंकराचार्याचे अद्वैत, रामानुजांचे विशिष्टाद्वैत ही तत्त्वदर्शने त्यांनी अभ्यासली, त्यावर ग्रंथ लिहिले, ते कन्नडमध्ये आणले आणि या तिघांवर तयार झालेल्या तीन चित्रपटांचे संवादलेखनही त्यांनी केले. वर्तमानपत्री लेखनालाही नाही म्हटले नाही आणि केवळ धार्मिक स्वरूपाच्या ग्रंथांपुरतेच मर्यादित न राहता शूद्रकासारख्या ‘सेक्युलर’ संस्कृत नाटककाराच्या ‘मृच्छकटिक’चेही कन्नड भाषांतर (आवैया मण्णिन आटद बंडि) करून त्यासाठी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार (२००१) मिळवला. बाणभट्टाची ‘कादंबरी’, भवभूतीचे ‘उत्तररामचरित’, कालिदासाचे शाकुंतल त्यांनी कन्नडमध्ये रसाळपणे आणले आणि वेद, उपनिषदे यांवर मर्मग्राही ग्रंथही लिहिले. त्यांची कन्या कविता उडपा ही भावगीत-गायिका. मध्वाचार्याच्या ‘चतुर्दशभजन’ या १४ पद्यरचना ‘लोकांनीही सहज गाव्यात म्हणून’ त्यांचा कन्नड जानपद-शैलीत गाता येईल असा अनुवाद (हद्नाकु हाडगळु) करून त्यांनी कन्येकरवी गाऊन घेतला होता! परंपरेच्या विद्यमानतेसाठी प्रयत्न करणारा विद्वान त्यांच्या निधनाने हरपला.