घनश्यामदास बिर्ला ते कुमारमंगलम बिर्ला या चार पिढय़ांपैकी दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी बी.के. ऊर्फ बसंतकुमार बिर्ला हे बुधवारी, ३ जुलै रोजी निवर्तले. गांधीजींना साथ देणारे उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे बी. के. हे सर्वात धाकटे पुत्र; तर आदित्यविक्रम बिर्ला हे या बी.के. यांचे सुपुत्र. म्हणजे कुमारमंगलम हे बी.के. यांचे नातू. स्वत: बी. के. यांनी वयाच्या पंधराव्या वर्षांपासून, म्हणजे १९३६ सालापासून व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली.  ‘केसोराम इंडस्ट्रीज’चे प्रमुख या नात्याने, विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी उद्योग वाढविला. प्लायवूड, लाकडासारखे ‘एमडीएफ, कॉफी, चहा, रसायने, नौकानयन अशा अनेक उत्पादनांमध्ये या केसोराम समूहाने हातपाय रोवले. ‘सेंच्युरी टेक्स्टाइल्स’ हा बिर्ला घराण्याची ओळख ठरलेला उद्योगही त्यांनी सांभाळला. या उद्योगाचे प्रमुख म्हणून त्यांचे नाव दीर्घकाळ राहिले. एकंदर कापडधंद्यावर आलेल्या विविध संकटांतूनही ‘सेंच्युरी’ तग धरून राहिली. इथिओपिया या देशात त्यांनी उद्योग उभारणी केली, म्हणून त्या देशाचा सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला होता. मात्र बी. के. यांची खरी ओळख उद्योगपती म्हणून नव्हे, तर दानी म्हणून उरली आहे!

कल्याणमध्ये १९७२ पासून सुरू झालेले ‘बी. के. बिर्ला कॉलेज’ ही याच बी.के. यांची देणगी. राजस्थानात बी.के. यांनी उभारलेली मोठी शिक्षण संस्था म्हणजे ‘बी. के. बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी- पिलानी’(बिट्स पिलानी नव्हे.. ते निराळे). त्याखेरीज ‘कृष्णार्पण ट्रस्ट’ ही धर्मादाय संस्था अनेक शिक्षणसंस्थांना तसेच गरजू , होतकरू विद्यार्थ्यांना मदत करीत असे.

‘जुन्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे उद्योगपती’ हे बिरूद बी.के. यांना चिकटण्याचे मोठे कारण म्हणजे, उद्योग सांभाळताना त्यातील कामगार व कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेला कल्याणकारी विचार! मात्र तो विचार आधीच लोप पावला, सेंच्युरीचे साम्राज्य पुरते आक्रसले आणि बी.के. यांच्या विवाहित कन्या मंजुश्री खेतान यांच्याकडे गेलेल्या केसोराम समूहाचीही वाटचाल खडतरच होऊ लागली होती. त्यांच्या जाण्याने उद्योग जगतातील जुन्या पिढीचा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.