‘स्थापत्य कलेत मी जे काम केले आहे ते माझे जीवन, तत्त्वज्ञान व स्वप्ने यांचे विस्तारित अंग आहे’ असे ते सांगतात. यावरून या कलेशी त्यांची एकात्मता प्रत्ययास येते. प्रादेशिक गरजा ओळखून शाश्वत सम्यक अधिवास तयार करणे महत्त्वाचे, हे त्यांचे मत असले तरी आधुनिकतेशी त्यांनी काडीमोड घेतलेला नाही. पण तरीही पारंपरिक रचना टिकवून ठेवल्या आहेत. हे वेगळ्या वाटेने जाणारे स्थापत्य विशारद म्हणजे बाळकृष्ण दोशी. त्यांना अलीकडेच स्थापत्यशास्त्रातील नोबेल म्हणजे प्रिटझ्कर पारितोषिक जाहीर झाले आहे. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय स्थापत्य विशारद.

दोशी यांचा जन्म १९२७ मध्ये पुण्यात झाला. १९४७ च्या सुमारास त्यांनी स्थापत्य कलेचा अभ्यास सुरू केला. मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतून त्यांनी पहिले धडे गिरवले. कोरबिझियर हे स्वीस-फ्रेंच स्थापत्य विशारद त्यांचे गुरू. कोरबिझियर यांच्या संस्थेत त्यांना केवळ त्यांच्या हस्ताक्षरातील अर्जाच्या आधारे नोकरी मिळाली होती. भारतात परत आल्यानंतर त्यांनी चंडीगड शहराच्या स्थापत्यरचनेत मोठी भूमिका पार पाडली. लुईस कान यांच्यासमवेत त्यांनी अहमदाबादच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची इमारत सुंदर पद्धतीने साकारली.

अनंत राजे यांच्याबरोबर काम करताना त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. १९५६मध्ये त्यांनी वास्तुशिल्प ही संस्था स्थापन केली. तीच आता वास्तुशिल्प कन्सल्टंट म्हणून काम करीत आहे. कमकुवत वर्गासाठी चांगली घरे बांधण्याच्या उद्देशाने त्यांनी अरण्य लो कॉस्ट हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इंदोर येथे साकार केला. त्यासाठी त्यांना आगाखान पुरस्कार मिळाला होता. आता या प्रकल्पात ८० हजार लोक राहतात. मध्यमवर्गीयांसाठी टुमदार व देखण्या घरांचा एक प्रकल्प अहमदाबाद येथे साकार केला. साठ वर्षांच्या काळात त्यांनी वास्तुकलेवर स्वत:ची छाप पाडली. त्यांच्या वास्तू या भारतीय स्थापत्य, इतिहास, संस्कृती, स्थानिक परंपरा व बदलता काळ यांची सांगड घालणाऱ्या आहेत. मध्य प्रदेश वीज मंडळाची इमारत, बेंगळूरुतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेची इमारत त्यांनी साकारल्या. या प्रत्येक वास्तूत एक सुखद अनुभव आल्याशिवाय राहत नाही. संगत नावाचा स्वत:चा स्टुडिओ त्यांनी अहमदाबाद येथे बांधला, त्यात टेरेस आहेत, चमकणारी तळी, वेडीवाकडी वळणे, छोटे डोंगर असे निसर्गाचे प्रतिरूप साकारले आहे. कृत्रिम व नैसर्गिक घटकांचा त्यांच्या या वास्तूत समतोल आहे.

शहर रचनाकार, शिक्षक , स्थापत्य विशारद अशा अनेक भूमिकांतून त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यालयात दुर्गा, गणपती यांच्यानंतर कोरबिझियर यांची प्रतिमा ठेवलेली आहे. अहमदाबाद येथे त्यांनी दी स्कूल ऑफ आर्किटेक्चर ही संस्था सुरू केली तीच आता सेंटर फॉर एन्व्हरॉन्मेंट प्लानिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाने प्रसिद्ध आहे. लुईस कान हे तेथे शिकवत असत. आधुनिक स्थापत्यकलेत त्यांनी भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे यात शंका नाही.