संगीत रंगभूमी ते आजची आधुनिक रंगभूमी असा तब्बल ६५ ते ७० वर्षांचा काळ रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून कार्यरत असणारे बापू लिमये हे मराठी रंगभूमीचा चालता-बोलता इतिहासच होते. मराठी रंगभूमीवर नेपथ्याचे जे अनेक जाणते प्रयोग पहिल्यांदा झाले- मग ते सूचक नेपथ्य असो किंवा सांकेतिक- त्याचे पितृत्व बापूंकडे जाते. अखंड नाटकाचाच विचार त्यांच्या मनात असे. अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे चिंतन सुरू होते. याची साक्ष म्हणजे गेली आठ वर्षे ते नाटय़शास्त्र शिकणाऱ्यांसाठी नेपथ्यावरील अद्ययावत पाठय़पुस्तक उपलब्ध करून देण्याकरिता धडपडत होते. त्यांचा हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असला तरी ते अजून प्रकाशित व्हायचे आहे. राज्य नाटय़स्पर्धेत त्यांनी ‘चक्रावर्त’ (दिग्द. अशोक साठे) नाटकाचे केलेले सूचक नेपथ्य खूप गाजले. गो. पु. देशपांडेंच्या ‘आर्य चाणक्य’मध्ये त्यांनी पातळ्यांचे (लेव्हल्स) नेपथ्य केले होते; ज्याचा नंतर प्रायोगिक-समांतर धारेतील रंगकर्मीनी मुक्तहस्ते वापर केला. ‘सं. सौभद्र’ लेव्हल्सवर करण्याचे धाडस त्यांनी केले. ‘चक्रावर्त’मुळे त्यांच्याकडे मुख्य धारेतील मंडळींचे लक्ष वेधले गेले. तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’च्या नेपथ्याची धुरा दिग्दर्शक डॉ. लागूंनी बापूंवर सोपवली आणि नेपथ्यासहित ते रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरले. ‘गाबरे’मध्येही त्यांनी सूचक नेपथ्याचा वस्तुपाठ घालून दिला. बाळ कोल्हटकर हे पारंपरिक रंगभूमीचे पाईक मानले जात असले तरी त्यांच्या ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’चे बापूंनी केलेले नेपथ्य मात्र आधुनिक होते. ‘सविता दामोदर परांजपे’पर्यंत अनेक व्यावसायिक तसेच हौशी नाटकांचे नेपथ्य बापूंनी साकारले. कमी खर्चात आणि कुठेही नेता येईल असे, नाटकाच्या आशयमूल्यांत भर घालणारे नेपथ्य साकारणारे नेपथ्यकार असा त्यांचा लौकिक होता.

रंगमंचीय सादरीकरणाच्या दृष्टीने संहितेच्या संपादनात बापूंची एवढी हुकमत होती की, अनेक नाटकांच्या रंगावृत्ती तयार करण्यात बापूंनी मोलाची भूमिका बजावली. ‘कटय़ार..’ची दोन अंकी रंगावृत्ती त्यांनी तयार केली होती; परंतु ती सादर करण्याचे धाडस कुणी दाखवले नाही. यातून त्यांच्याकडे एक विलक्षण अशी दिग्दर्शकीय नजरही होती, हे सिद्ध होते. त्यांनी काही नाटके दिग्दर्शित केलीही; परंतु त्यात ते रमले नाहीत. राज्य नाटय़स्पर्धाना आवर्जून हजेरी लावणारा, त्यात सादर होणाऱ्या प्रयोगांची आस्थेने चिकित्सा करणारा बापूंइतका जाणकार रंगकर्मी सापडणे अवघड. त्यांनी अनेक वर्षे ‘रसरंग’मध्ये मार्मिक नाटय़समीक्षाही केली. राज्य शासनाची नाटय़शिबिरे बापूंशिवाय पुरी होत नसत. सेंट्रल रेल्वेत नोकरी करणाऱ्या बापूंनी तिथेही कल्चरल अ‍ॅकॅडमीची स्थापन केली. त्यांचे ‘गोष्ट नेपथ्याची’ हे पुस्तक इंग्रजीतही प्रसिद्ध झाले आहे. ठाणे-कल्याणमधील नाटय़कर्मीसाठी तर बापू कायम आधारस्तंभ होते. प्रत्येक नाटय़ संमेलनाला जातीने हजेरी लावणारे बापू नाटय़ परिषदेतील राजकारणामुळे नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष मात्र कधीच होऊ शकले नाहीत.