तो निर्वासित. इराणमधला कुर्दी, म्हणून मायदेशात नकोसा. ऑस्ट्रेलियात त्याने आश्रय मागितला. अधिकाऱ्यांनी नकार देऊन त्याला प्रशांत महासागरातल्या ‘मानुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावरल्या बंदिगृहात धाडले. ‘मी लेखक आहे- साहित्यिक आहे- मला नका तिथे पाठवू’ ही त्याची विनवणी व्यर्थ गेली. पण गेल्या आठवडय़ात त्याच्याच ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ या नव्या पुस्तकाला, एक लाख ऑस्ट्रेलियन डॉलरचा ‘सर्वोत्कृष्ट व्हिक्टोरियन प्रीमियर्स’ साहित्यपुरस्कार आणि याच ‘व्हिक्टोरियन प्रीमियर्स’ पुरस्कारांपैकी ‘ललितेतर गद्य’ श्रेणीसाठी २५ हजार ऑस्ट्रे.-डॉलरचा पुरस्कार (एकंदर किमान ६४ लाख ७६ हजार रुपये) मिळाला!

बेहरूज बूचानी हे त्या लेखकाचे नाव. वय सध्या ३६. पण अठराव्या वर्षांपासून तो लिहितो आहे.  राजकीय भूगोल या विषयात पदवी घेऊन तो पत्रकार झाला. अनेक इंग्रजी, पर्शियन नियतकालिकांत लिखाण केल्यानंतर ‘वेरया’ या कुर्दी वृत्तनियतकालिकाची स्थापना त्याने इलम या इराणमधील त्याच्या गावी केली.  पण इस्लामी राजवटीच्या ‘रक्षकां’नी त्या कार्यालयावर छापा घालून, ११ पैकी सहा सहकाऱ्यांना कोठडीत डांबले. त्या दिवशी तेहरानला होता, म्हणून बेहरूज  वाचला. तिथून त्याने देशाबाहेरचा रस्ता धरला. इंडोनेशियामार्गे ऑस्ट्रेलियात जाण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि पुढल्या प्रयत्नात त्याची रवानगी मानुस बेटावरील तुरुंगात झाली. बेहरूजचे लिखाण अतिशय संवेदनशील, पण कथाकादंबऱ्यांत त्याची लेखणी रमत नाही. मानुस बेटावरील तुरुंगात त्याने स्वत:मधला लेखक ‘जिवंत’ ठेवला, तेव्हा मात्र त्याने स्वत:ला ‘कादंबरीकार’ मानले. मानवी जीवन समजून घेणाऱ्या अनेक कादंबरीकारांचे आदर्श त्याने स्वत:च्या दृष्टीत जणू मुरवून घेतले, आणि स्वत:कडेही तो त्रयस्थपणे – त्या स्वत:मधल्याच कादंबरीकाराच्या दृष्टीने- पाहू लागला. त्याचे ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ हे पुस्तक म्हणजे कैदेतील स्वत:चा खडतर जीवनक्रम त्रयस्थपणे सांगणारे आत्मपर गद्य.

बेहरूजला या तुरुंगातही ‘स्मार्टफोन’ वापराची मुभा होती, त्यामुळे तो अभिव्यक्त होऊ शकला! ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ हे पुस्तक त्याने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून क्रमाक्रमाने प्रकाशकांकडे (पिकॅडोर ऑस्ट्रेलिया) पाठविले, तर ‘चौका, प्लीज टेल मी द टाइम’ हा लघुपटही त्याने याच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून टिपला. त्याच्या कहाणीवर आधारित ‘मानुस’ हे स्वीडिश नाटकही लिहिले गेले, पण २०१५ पासून ‘पेन इंटरनॅशनल’ने त्याच्या सुटकेसाठी घेतलेला पुढाकार व्यर्थ ठरला.