12 December 2017

News Flash

बिनेश जोसेफ

१९ लाख रुपयांचा हा पुरस्कार मेसर फाऊंडेशनतर्फे दिला जातो.

लोकसत्ता टीम | Updated: September 27, 2017 2:22 AM

बिनेश जोसेफ

 

अलीकडच्या काळात अगदी सर्दी झाली तरी प्रतिजैविकांची मात्रा अनेक डॉक्टर्स मोठय़ा प्रमाणात देत असतात. प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे त्यांचा जिवाणूंवर परिणाम होईनासा झाला आहे. त्यातूनच कुठल्याही औषधांचा ज्यांच्यावर परिणाम होणार नाही अशा महाजिवाणूंची निर्मिती झाली. ते कोणत्याही औषधांना जुमानत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनेही प्रतिजैविके म्हणजे अ‍ॅण्टिबायोटिक्सच्या अतिवापराबाबत इशारा दिला असला तरी हा वापर मुक्त हस्ताने सुरू आहे. याचा परिणाम म्हणून क्षयासारख्या रोगावर आता काही प्रतिजैविके काम करेनाशी झाली आहेत. त्यामुळेच नवीन औषधे व प्रतिजैविकांचा शोध घेणे आवश्यक आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जर्मनीत गोथे विद्यापीठात संशोधन करणारे मूळ भारतीय असलेले वैज्ञानिक बिनेश जोसेफ यांना ‘अ‍ॅडॉल्फ मेसर पुरस्कार’ नुकताच देण्यात आला आहे. १९ लाख रुपयांचा हा पुरस्कार मेसर फाऊंडेशनतर्फे दिला जातो.

जिवाणू त्यांची बचावक्षमता वाढवीत असताना त्यांना मारण्यासाठी नवी प्रतिजैविके तयार करणे हे वैज्ञानिकांपुढचे मोठे आव्हान आहे. जिवाणूंमध्ये असममिताकार असे बाहेरचे आवरण असते. त्यात काही प्रथिने असतात ती या जिवाणूंना वेगवेगळ्या औषधांच्या माऱ्यातही जिवंत ठेवतात. त्यामुळे त्यांची ही अभेद्य तटबंदी मोडून काढण्यासाठी नवीन औषधे तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे बिनेश यांनी सांगितले आहे. जिवाणूंच्या भोवती जे आवरण असते त्याचा अभ्यास करण्यासाठी ते पेशींपासून वेगळे काढावे लागते तरच जिवाणू निष्प्रभ होतात. जिवाणूंच्या बाह्य़ावरणातील प्रथिनांचा अभ्यास प्रगत जैवभौतिक तंत्राने केला जातो ते इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोग्राफी तंत्र बिनेश यांनी जिवाणूंच्या अभ्यासासाठी वापरले आहे. त्यातूनच बहुऔषध प्रतिकारक जिवाणूंना म्हणजे महाजिवाणूंना मारणारी नवी प्रतिजैविके तयार करता येतील. ही प्रतिजैविके मग जिवाणूकडून शोषली जाऊन ते मरतील पण त्यासाठी जिवाणूंचे मानवी पेशीविरोधातील युद्धतंत्र समजून घेण्याची मूलभूत कामगिरी जोसेफ व त्यांचे सहकारी करीत आहेत.

बिनेश यांचा जन्म केरळातील कोळिकोड जिल्ह्य़ातील मराथोमकारा या छोटय़ाशा खेडय़ात झाला. तेथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी जर्मनीत गेले. जैवरसायनशास्त्र, वर्णपंक्तीशास्त्र, जैवभौतिकशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी एकूण २० शोधनिबंध लिहिले असून त्यांचा संदर्भ मोठय़ा प्रमाणात घेतला गेला आहे. त्यांच्या या संशोधनातून महाजिवाणूंवर रामबाण उपाय ठरणाऱ्या नवीन औषधांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. बिनेश यांना हा पुरस्कार मिळाल्याने अनेक तरुणांना मूलभूत संशोधनाची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रँकफर्टच्या गुटे विद्यापीठात जोसेफ कार्यरत आहेत. त्यांना रोगकारक जिवाणूंवरील संशोधनासाठी प्रतिष्ठेचा मानला जाणारा मेसर पुरस्कार मिळाला, याबद्दल त्या विद्यापीठानेही अभिमान बाळगला आहे. हा पुरस्कार १९९४ पासून मूलभूत संशोधनात कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जातो. यातील पूर्वीचे अनेक पारितोषिक विजेते या विद्यापीठात आता अध्यापनाचे काम करीत आहेत. बिनेश जोसेफ यांनी जिवाणूंविरोधात पर्यायी उपाययोजनांवर केलेले संशोधन ही त्यांची जमेची बाजू आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते मेसर हे जर्मनीतील एक संशोधक व उद्योगपती होते. त्यांनी अ‍ॅसिटिलिन जनरेटर कंपनी स्थापन केली होती. नंतर त्यांच्या मेसर समूहाचे नाव आता जगात औद्योगिक कारणांसाठी लागणाऱ्या वायूंच्या निर्मितीत अग्रक्रमाने घेतले जाते.

First Published on September 27, 2017 2:22 am

Web Title: benesh joseph aevadolpha messer award