14 August 2020

News Flash

मेगन रॅपिनो

मेगान रॅपिनोला सोमवारी ‘फिफा’कडून वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मेगन रॅपिनो

अमेरिकेची फुटबॉलपटू मेगान रॅपिनोला सोमवारी ‘फिफा’कडून वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. २०१५ आणि २०१९ अशी दोन विश्वविजेतीपदे, २०१२च्या लंडन ऑलिम्पिकचे सुवर्णपदक असे देशासाठी महत्त्वाचे यश मिळवणारी रॅपिनो स्पष्टवक्ती, बंडखोर, सामाजिक भान असणारी आहे.

कॅलिफोर्नियानिवासी रॅपिनोची पाच भावंडे. पैकी मोठा भाऊ ब्रायनमुळे वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून तिला फुटबॉलची आवड निर्माण झाली. जेव्हा ती १० वर्षांची झाली, तेव्हा ड्रग्ज सेवनामुळे ब्रायनची घडू पाहणारी कारकीर्द अकाली संपुष्टात आली. परंतु रॅपिनोने आणि तिची बहीण रॅशेलने फुटबॉलची वाट पक्की केली. त्यानंतर पोर्टलँड विद्यापीठ आणि एल्क ग्रोव्ह प्राइड या संघांकडून खेळू लागली. २००३ ते २००५पर्यंत अमेरिकी युवा संघाकडून खेळल्यावर, तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २००६पासून सुरू झाली. २०११च्या महिला विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदानंतर अमेरिकेचा सुवर्णप्रवास सुरू झाला. या विश्वचषकाच्या ब्राझीलविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात अतिरिक्त वेळेत १२२व्या मिनिटाला रॅपिनोने दिलेल्या क्रॉसवर अ‍ॅबी वॅमबॅशने गोल साकारून बरोबरी साधली. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये रॅपिनोचा गोल महत्त्वाचा ठरला. २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये कॉर्नरच्या स्थानावरून थेट गोल साकारणारी पहिली फुटबॉलपटू ठरलेल्या रॅपिनोने या ऑलिम्पिकसह २०१५च्या अमेरिकेच्या विश्वविजेतेपदातही छाप पाडली. पण २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच संघाला गाशा गुंडाळावा लागला. मग २५२ दिवस स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर राहिल्यानंतर तिच्या पुनरागमनाला दुखापतीचे ग्रहण लागले. प्रशिक्षक जिल एलिस तिच्या कामगिरीबाबत समाधानी नव्हत्या. तरीही तिने पुनरागमन केले. २०१९च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तिने गोलचे अर्धशतक पूर्ण केले. सामनावीर, स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल केल्याबद्दल ‘गोल्डन बूट’ आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा ‘गोल्डन बॉल’ हे पुरस्कार तिला प्रदान करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तिने महिला फुटबॉलला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ‘फिफा’वरच टीका केली. या विश्वचषकादरम्यान एका वार्तालापात ‘मी व्हाइट हाऊसमध्ये पाऊलही टाकणार नाही. तशी मला इच्छादेखील नाही,’ असे मतप्रदर्शन केले, त्याला ट्रम्प यांनी ‘आधी विश्वचषक जिंकून दाखवा’ असे प्रत्युत्तर दिले. रॅपिनोच्या पराक्रमामुळे अमेरिकेला विजेतेपद मिळाले आणि ट्रम्प टीकेचे धनी ठरले! याआधी ट्रम्प यांच्यादेखत राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे न राहता त्यांचा राजकीय निषेध नोंदवणाऱ्या खेळाडूंतही रॅपिनोचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 2:25 am

Web Title: best fifa women player 2019 megan rapinoe zws 70
Next Stories
1 राहुल आवारे
2 रॉबर्ट बॉयड
3 अम्बई
Just Now!
X