म. गांधी यांचे निधन झाले, त्या वेळी लिहिलेली त्यांची पहिली कविता गाजली, त्यानंतर मागे वळून न पाहता सुमारे पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी गुजराती साहित्य क्षेत्र लेखनकर्तृत्वाने गाजवले ते चतुरस्र गुजराती साहित्यिक म्हणजे भगवतीकुमार शर्मा. त्यांच्या जाण्याने गुजराती साहित्य विश्वाने एक मोहरा गमावला आहे.  लेखक, पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय शिक्षण माध्यमिक स्तरापर्यंत झाले. त्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली, अर्थात नंतरच्या काळात म्हणजे १९६८ मध्ये त्यांनी गुजराती व इंग्रजी भाषेत पदवी घेतली. महात्मा गांधी यांच्या निधनावेळी लिहिलेल्या कवितेनंतर त्यांनी १९५२ मध्ये जी दोन सुनीत काव्ये लिहिली होती, ती ‘गुजरातमित्र’ या सुरतमधील वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. गुजराती साहित्य परिषदेचे ते २००९ ते २०११ या काळात अध्यक्ष होते. कादंबरी, लघुकथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांतून त्यांनी लेखन केले. त्यांच्या ‘असूर्यलोक’ या पुस्तकाला १९८७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी सुमारे ८० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात ‘आरती आने अंगारा ’(१९५७), ‘मन नहीं माने’ (१९६२), ‘रिक्त’ (१९६८),‘ व्यक्तमध्य’ (१९७०),‘ समयद्वीप’(१९७४), ‘ऊध्र्वमूल’ (१९८१), ‘असूर्यलोक’ (१९८७), ‘द्वार नही खुले’, ‘प्रेमयात्रा’, ‘विती जसे आ रात..’, ‘पडछाया संगीत ’(१९६३), ‘ना किनारो ना मझधार’(१९६५), ‘हृदयशरण निर्विकल्प’ (२००६). त्यांच्या ‘समयद्वीप’ या पुस्तकात जुनी ब्राह्मण संस्कृती व आधुनिक संवेदनशीलता यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लघुकथासंग्रह अनेक लिहिले. त्यात ‘दीप से दीप जले ’(१९५९), ‘हृदयदान ’(१९६०), ‘रातराणी’, ‘छिन्नभिन्न’ (१९६७), ‘महेक माली गई तुमने फूल दिधानु याद नथी’ (१९७०), ‘कई याद नथी’ (१९७४), ‘व्यर्थ कक्को’, ‘छाल बाराखडी’ (१९७९), ‘अकथ्य’ (१९९४), ‘मांगल्य कथाओ’ (२००१), ‘अडबीद’ (१९८७) यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडक कथा ‘भगवतीकुमारनी श्रेष्ठ वार्ता ’(१९८७) नावाने प्रसिद्ध आहेत.  त्यांनी ‘अमेरिका आवजे’(१९९६) हे प्रवासवर्णनही लिहिले. गझल, सुनीत, गीत अशा सर्व प्रांतांत त्यांनी सहज विहार केला. संभव हा त्यांचा पहिला गझलसंग्रह तर ‘छांदो छे पनदादा जेनान’,  ‘झलहल’, ‘आधी अक्षरनु चोमासु’, ‘उजागरो’, एक कागल हरिवरणे, गझलयान हे त्यांचे काव्यसंग्रह. ‘सरल शास्त्रीजी’ हे जीवनचरित्र त्यांनी लिहिले. सुरतवर त्यांचे विशेष प्रेम होते, ‘सुरत मुज घायल भूमी’ हे त्यांचे आत्मचरित्र त्याचीच साक्ष देते. कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, साहित्य अकादमी पुरस्कार, डी. लिट, कलापी पुरस्कार, हिरद्र दवे स्मृती पुरस्कार, नचिकेत पुरस्कार,  गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. गुजरात मित्रच्या संपादक विभागात ते बराच काळ काम करीत होते, त्या वेळी अग्रलेखांमधून पत्रकार म्हणून त्यांची लेखणी तलवारीसारखीही तळपली. पण साहित्य हेच त्यांचे खरे विश्व होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagwatikumar sharma
First published on: 08-09-2018 at 01:55 IST