डॉ. आंबेडकरांसह लाखो अनुयायांना दीक्षा देणारे भन्ते प्रज्ञानंद यांच्या निधनाने सहा दशकांपूर्वी नागपुरात झालेल्या धम्मदीक्षा कार्यक्रमातील शेवटचा दुवा निखळला आहे. १४ ऑक्टोबर १९५६ ला आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करत लाखो दलित अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या साऱ्यांना धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भन्तेंच्या पथकात प्रज्ञानंद होते. त्यांच्या निधनाने भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी पर्वाचा साक्षीदार पडद्याआड गेला आहे.

प्रज्ञानंद मूळचे श्रीलंकेचे. १८ डिसेंबर १९२७ला कॅण्डी येथे जन्मलेल्या या भन्तेंचे प्राथमिक शिक्षण श्रीलंकेतच झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांना धर्मप्रसाराचे महत्त्व वाटू लागले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अनागरिक धम्मपाल यांनी त्यांना श्रीलंकेतून भारतात आणले. येथे आल्यावर त्यांचा संपर्क उत्तर प्रदेशातील लालकुंवा येथील बुद्ध विहाराचे संस्थापक भन्ते बोधानंद यांच्याशी झाला. उर्वरित शिक्षण उत्तर प्रदेशात पूर्ण करत त्यांनी त्रिपिटीकाचार्य ही पदवी मिळवली. १९४२ला त्यांनी धम्मदीक्षा घेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले. श्रामणेर दीक्षेनंतर त्यांना प्रज्ञानंद हे नाव देण्यात आले.

mira road, Young college going girl, Dies, Tragic Two Wheeler Accident, accident in mira road, dies student in accident, two wheelar accident mira road, accident news,
दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल
Kerala Student Death Case
केरळमधील जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरण; पोलीस अहवालात धक्कादायक माहिती समोर, तब्बल २९ तास मानसिक छळ अन्…
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
Evening broadcast of Akashvani Pune Kendra resumed from April 7
आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे प्रसारण ७ एप्रिलपासून पूर्ववत, पुणेकर श्रोत्यांच्या लढ्याला यश

तो काळ डॉ. आंबेडकरांच्या दलित समाजावरील प्रभावाचा होता. त्यांनी धर्मातराची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी सभा घेणे सुरू केले होते. आंबेडकर नाशिकजवळील येवल्याला गेले असताना तेथे त्यांची बोधानंद व प्रज्ञानंदांशी भेट झाली. या भेटीत धम्मदीक्षा कार्यक्रमाचे स्वरूप ठरले. बोधानंदांनी प्रज्ञानंदांना आंबेडकरांच्या सोबत दिले. नंतर नागपूरच्या सोहळ्यात महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वातील पथकात प्रज्ञानंद सहभागी झाले. नंतर बोधानंद यांचे निधन झाले तेव्हा प्रज्ञानंद केवळ २५ वर्षांचे होते. तरुण वयातच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुखपद आले. नागपूरच्या सोहळ्यानंतर देशभरातील दलित बांधवांकडून धम्मदीक्षेसाठी मागणी येऊ लागली. त्यासाठी प्रज्ञानंद अनेक ठिकाणी गेले. उत्तर प्रदेशातील अलीगढला त्यांनी अडीच लाख लोकांना दीक्षा दिली. आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर देशातील अनेक भागांत लोक दीक्षेसाठी इच्छुक होते, पण तेव्हा प्रशिक्षित भिक्खूच नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रज्ञानंदांनी भिक्खूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीला रेन चेन भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. आज जगभरात या केंद्राचे नाव आदराने घेतले जाते.

नंतरच्या काळात धर्मप्रसार व रचनात्मक कार्यासाठी वाहून घेतलेल्या प्रज्ञानंदांनी अनेक संस्थांमध्ये पदे भूषवली. भारती शिक्षण परिषद, श्रावस्तीचे जेतवन महाविद्यालय, भारतीय बौद्ध परिषद व महाबोधी विद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. देशाच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. ‘मानव उत्थान’ हे पाक्षिक तसेच ‘मध्यम मार्ग’ नावाचे साप्ताहिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित व्हायचे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीला त्यांनी मूळ भारत निवासी वसतिगृहाची स्थापना केली. शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्य करता यावे म्हणून त्यांनी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात मानव उत्थान मिशन नावाचे अभियान प्रभावीपणे राबवले. प्रज्ञानंदांनी देश-विदेशातील अनेक बौद्ध परिषदांमध्ये सहभाग घेतला. १९५४ला ब्रह्मदेशातील रंगून येथे झालेल्या सहाव्या धम्मसंगिनी परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. याच परिषदेत ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा भेटले. त्यांनी बौद्ध धर्माची महती सांगणाऱ्या  पण पाली भाषेत असलेल्या अनेक ग्रंथांचा हिंदीत अनुवाद केला. ‘वज्रसूची’ हा त्यातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्या निधनाने देशात सामाजिक इतिहास घडवणाऱ्या धम्मदीक्षा कार्यक्रमातील भन्तेंच्या पथकातील शेवटचा साक्षीदार गमावला आहे.