News Flash

भास्कर मेनन

निवृत्तीनंतरही, गेल्या १५ वर्षांत ‘एनडीटीव्ही’सह अनेक माध्यमकंपन्यांचे गुंतवणूकदार व संचालक म्हणून त्यांचा दबदबा होता.

भास्कर मेनन

प्रतिष्ठित ‘डून स्कूल’मध्ये शालेय शिक्षण आणि ऑक्सफर्डला पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन १९५०च्या दशकात भास्कर मेननच काय, कुणीही कुठल्याशा अधिकारपदावर नियुक्त झालेच असते. पण भास्कर मेनन त्यापुढे गेले. आंतरराष्ट्रीय व्यवसाय क्षेत्रात नाव कमावणाऱ्या भारतीयांच्या पहिल्या पिढीतील उच्चपदस्थ आणि ‘रॉक अ‍ॅण्ड रोल संगीताला यश मिळवून देणारा व्यवसायनेता’ अशी ओळख मिळवूनच निवृत्त झाले. मेनन यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने, संगीत क्षेत्र जेव्हा रेकॉर्ड, कॅसेट व सीडी यांवर अवलंबून होते त्या काळातला एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

‘आयसीएस’ अधिकारी आणि पुढे भारताचे वित्त सचिव झालेले केआरके मेनन यांच्या घरात १९३४ साली जन्मलेले भास्कर मेनन १९५६ मध्ये ऑक्सफर्डचे शिक्षण संपवून लंडनच्या ‘एमी रेकॉर्ड्स’ या ग्रामोफोन तबकड्या उत्पादक कंपनीत अधिकारपदी गेले. या कंपनीची ‘एचएमव्ही’ ही उपकंपनी भारतात होती, तिथे १९५७ मध्ये भास्कर यांची बदली करण्यात आली. पुढे १९७८ मध्ये ‘एमी’चे जागतिक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (वल्र्डवाइड प्रेसिडेंट, सीईओ) पदावर त्यांची नेमणूक झाली. निवृत्तीनंतरही, गेल्या १५ वर्षांत ‘एनडीटीव्ही’सह अनेक माध्यमकंपन्यांचे गुंतवणूकदार व संचालक म्हणून त्यांचा दबदबा होता.

पण या व्यावसायिक परिचयाच्या पलीकडे, संगीत क्षेत्रावर आणि नव्या प्रवाहांवर प्रेम करणारा जाणकार म्हणूनही भास्कर मेनन यांची ओळख होती. ‘एमएमव्ही’मध्ये असताना, ‘बीटल्स’या संगीत चमूतील वादक जॉर्ज हॅरिसन यांच्यासाठी अद्यायावतच ध्वनिमुद्रण यंत्र हवे, म्हणून रेल्वेने कोलकात्याहून मुंबईला स्वत:सह ही यंत्रे घेऊन येणारे ‘एचएमव्ही’चे भारतातील प्रमुख भास्कर मेनन! पुढल्याच वर्षी (१९६९) ते  ‘एमी इंटरनॅशनल’चे सरव्यवस्थापक झाले, आणि १९७१ मध्ये अमेरिकेतील नीट न चालणाऱ्या ‘कॅपिटॉल’ या उपकंपनीचा जिम्मा ‘एमी’ने त्यांना दिला. ‘पिंक फ्लॉइड’ या चमूचे पहिले काही संगीतसंग्रह (आल्बम) म्हणावे तसे यशस्वी झाले नसूनही, ‘डार्क साइड ऑफ द मून’ हा संग्रह काढण्याची जोखीम मेनन यांनी घेतली आणि त्यांच्या जाणकारीचे यश म्हणजे, पुढली सलग काही वर्षे हा संग्रह गाजत राहिला! संगीत उद्याोग डिजिटल युगात शिरण्यापूर्वीच, १९९० मध्ये ते निवृत्त झाले. त्याआधी ध्वनिमुद्रण-उद्याोगाचा जागतिक महासंघ असलेल्या ‘आयएफपीआय’चे गौरवपदक आणि फ्रेंच सरकारचा ‘शवालिए दु ऑद्र्र’ (कला क्षेत्रातील उमराव) हे पुरस्कार त्यांना मिळाले होते. मेनन यांचे निधन लॉस एंजलिसमधील राहत्या घरी, ७ मार्च रोजी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:01 am

Web Title: bhaskar menon profile abn 97
Next Stories
1 पुरुषोत्तमन् सतीशकुमार
2 प्रा. पीटर गॉड्स्बी
3 रवींद्र साळवे
Just Now!
X