07 April 2020

News Flash

बिन्नी यांगा

अरुणाचल प्रदेशात राहून तेथे उभारलेल्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ मिळविणाऱ्या बिन्नी यांगा यांचे निधन,

अरुणाचल प्रदेशात राहून तेथे उभारलेल्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ मिळविणाऱ्या बिन्नी यांगा यांचे निधन, ही बातमी त्या राज्याबाहेरील प्रसारमाध्यमांना कदाचित महत्त्वाची वाटणार नाही. गेली आठ वर्षे ओटीपोटातील कर्करोगाशी झुंज देत त्यांची जीवनयात्रा संपली.

बिन्नी यांगा यांच्यासारख्यांच्या जीवनप्रवासाचे महत्त्व केवळ राज्यापुरतेच मर्यादित राहणारे नाही. कारण प्रगतीच्या आत्मकेंद्रित संधी नाकारून स्वत:च्या प्रदेशासाठी संस्थांचे जाळे उभारण्याचा आणि त्यातून देशसेवाच करण्याचा त्यांचा चंग कोणाही भारतीयाला प्रेरक ठरावा असा आहे. इटानगर जिल्ह्य़ात ७ जुलै १९५८ रोजी जन्मलेल्या बिन्नी महाविद्यालयीन शिक्षणासाठी राजस्थानच्या ‘बनस्थली विद्यापीठा’त गेल्या. तेथून परतल्या, त्या शिक्षिका होण्याचे ठरवूनच. ‘बनस्थली’ हे महिलांचे विद्यापीठ असल्याने, स्त्रियांची स्थिती स्त्रियांनीच सुधारली पाहिजे हा संस्कारही बिन्नी यांनी सहज अंगी बाणवला होता. इतका की, शाळेत नोकरी न करता त्यांनी १९७९ ‘ऑल सुबानसिरी डिस्ट्रिक्ट गर्ल्स असोसिएशन’ची स्थापना केली. वयाच्या एकविसाव्या वर्षी बिन्नी यांना लढायचे होते ते अरुणाचलमधील मुलींचे कमी वयातील विवाह, हुंडापद्धती अशा पिढय़ान्पिढय़ा न बदललेल्या सामाजिक अपप्रवृत्तींशी.
स्त्रियांचा हा लढा फक्त जाणीवजागृतीने थांबणारा नाही, त्यासाठी जगण्याचे बळदेखील कमवायला हवे आणि हे बळ शिक्षणाखेरीज मिळणार नाही, हे कामातूनच बिन्नी यांना उमगत गेले. पण नेमके त्याच वेळी, अरुणाचल प्रदेश पोलीस दलात नव्यानेच स्थापन होणाऱ्या महिला पोलीस विभागातील संधीही त्यांना खुणावत होती. ती त्यांनी घेतली. १९८७ साली, पहिल्या अरुणाचली महिला पोलीस तुकडीत बिन्नी यांचा समावेश झाला. मात्र हे आपले ध्येय नव्हे, असे लक्षात आल्याने वर्षभरातच पोलीस दल सोडून त्यांनी पुन्हा संस्था उभारणीत स्वत:ला गाडून घेतले. मुलांसाठी अनाथालय, १०० मुलामुलींसाठी शाळा, असा व्याप वाढला आणि ‘ओजो वेल्फेअर असोसिएशन’चे नावही वाढत गेले. महिलांच्या सहकारी गटांतर्फे वस्तू बनवल्या तरी दलालांकडून पिळवणूक होतेच, म्हणून बिन्नी यांनी ‘हिमगिरी सहकारी विपणन (विक्री) संस्था’च्या स्थापनेत पुढाकार घेतला. या निरलस कार्याचे फळ त्यांना २०१२ मध्ये ‘पद्मश्री’तून मिळाले. नियोजन मंडळासह अनेक सरकारी समित्यांवरही पुढे त्यांची नेमणूक झाली होती, पण कर्करोगामुळे गेल्या काही वर्षांत त्यांनी दिल्लीत येणे-जाणे कमी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 4:11 am

Web Title: binni yanga profile
Next Stories
1 डॉ. सोमक रायचौधुरी
2 वेस क्रेव्हन
3 राजीव मेहरिषी
Just Now!
X