भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अनेक अधिकारी निवृत्तीनंतर खासगी कंपन्यांत सल्लागार किंवा संचालक म्हणून रुजू होतात, तसे बी. एन. युगंधर यांनी केले नाही. एकाच ठिकाणी त्यांचे नाव ‘संचालक’ म्हणून सापडते, ते अपंगांसाठीच्या एका कल्याणकारी संस्थेत! या युगंधर यांनी अपंगांसाठी यापूर्वीही काम केले होते. युगंधर हे २००४ ते २००९ या काळात केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य होते, तेव्हा अपंगस्नेही इमारतींच्या सक्तीसह अनेक अपंगकेंद्री धोरणांना त्यांनी दिशा दिली होती. अर्थात, त्यांच्या कारकीर्दीतील आवर्जून सांगावे असे कार्य हे एवढेच नव्हे. १६ सप्टेंबर रोजी युगंधर यांचे हैदराबादेतील राहत्या घरी, वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले; त्यानंतरच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या काळात त्यांचे ‘माजी विद्यार्थी’ आणि विद्यमान आयएएस अधिकारी, काही पत्रकार यांच्याकडून युगंधर यांची थोरवी सांगणारा स्मृतिकोश उलगडू लागला..

तत्कालीन आंध्र प्रदेश केडरमध्ये १९६२च्या बॅचचे अधिकारी म्हणून युगंधर रुजू झाले. त्यानंतर १९७० च्या दशकापर्यंत ग्रामीण प्रशासनावर त्यांनी पकड बसविली. नक्षलवाद आंध्रातही वाढू लागला तेव्हा, ‘केवळ पोलिसी कारवाई नव्हे, विकास व शिक्षणप्रसार हेही यावर उत्तर आहे’ हे त्यांचे मत त्या वेळी कानांआड झाले, पण ग्रामविकास आणि लोककल्याणाच्या कामात ते गढून गेले. पुढे एन. टी. रामाराव यांच्या काळात ‘दोन रुपये किलो तांदूळ’ यासारख्या ‘लोकानुनयी’ म्हणून विरोधकांनी हिणवलेल्या योजनेची चोख आखणी करताना, हा अनुभव उपयोगी पडला. ‘स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी’ अनेक असतात; पण युगंधर खरोखरच स्वच्छ! हे पी. व्ही. नरसिंह राव यांनी हेरले आणि पंतप्रधान झाल्यावर युगंधर यांना केंद्रीय ग्रामीण विकास खात्यात सचिवपद दिले. मात्र त्याआधीच (१९८८ ते ९३) केंद्रीय नियुक्ती त्यांना मिळाली होती, ती होती मसुरीच्या ‘लालबहादूर शास्त्री अ‍ॅकॅडमी’चे संचालक म्हणून! परराष्ट्र खात्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या निरुपमा राव यांच्यासारखे अनेक जण हे युगंधर यांचे विद्यार्थी होते. नियोजन मंडळातील नियुक्ती निवृत्तीनंतर त्यांना मिळाली; परंतु २००९ नंतर त्यांनी एकाही मंडळ वा महामंडळातील पद स्वीकारले नव्हते. लहानपणापासूनचा वाचनाचा छंद त्यांनी निवृत्तीनंतरही जोपासला होता. काही स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित होते.

युगंधर यांचे पूर्ण नाव बुक्कपुरम नाडेला युगंधर. यापैकी ‘नाडेला’ हे उपनाम अनेकांना ओळखीचे वाटत असेल; कारण मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला हे युगंधर यांचे पुत्र.