24 November 2020

News Flash

प्रत्युषकुमार

अमेरिका सध्या हे विमान सौदी अरेबिया, इस्रायल आणि जपान या देशांना विकते.

प्रत्युषकुमार

बिहारमध्ये वीज आणि रस्तेजोडणी नसलेल्या एका गावात जन्मलेले प्रत्युषकुमार सुरुवातीचा काही काळ शाळेतही गेले नव्हते. त्यांना त्यांच्या आजोबांनी घरातच जुजबी पण उपयुक्त शिक्षण दिले. वयाच्या ११व्या वर्षी दिल्लीला गेल्यानंतर प्रत्युषकुमारांनी पहिल्यांदा टीव्ही पाहिला! नुकतीच बोइंग कंपनीत एफ-१५ लढाऊ विमान प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या या अभियंत्याची सुरुवातीची पाश्र्वभूमी कुणाहीसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्युषकुमार यांनी पुढे दिल्ली आयआयटीतून अभियांत्रिकीची पदवी आणि अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली. सुरुवातीचा काही काळ त्यांनी मॅकिन्से आणि जनरल इलेक्ट्रिक या मातब्बर कंपन्यांमध्ये काम केले. स्टार्ट-अप कंपन्याही चालवल्या. पण तंत्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने उजळली बोइंग एअरप्लेन कंपनीमध्ये. या कंपनीला भारतात स्थिरावण्यासाठी प्रत्युषकुमार यांनी मोलाचे योगदान दिले. सध्या ते बोइंग इंडियाचे अध्यक्ष आणि बोइंग इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष आहेत.

गेल्या सहा वर्षांमध्ये बेंगळूरु आणि हैदराबाद येथे बोइंगची केंद्रे उभारून ती विकसित करण्यात प्रत्युषकुमार यांनी पुढाकार घेतला. बेंगळूरु तंत्रज्ञान आणि अवकाश उद्योगाच्या क्षेत्रात बोइंगसाठी महत्त्वाचे केंद्र (हब) बनले. याच काळात हैदराबाद येथील केंद्राचाही विकास प्रत्युषकुमार यांच्या अधिपत्याखाली झाला. या ठिकाणी टाटा समूहाच्या सहकार्याने चिनूक लढाऊ हेलिकॉप्टरचे सुटे भाग बनवणारी यंत्रणा उभी राहिली. भारतातील ग्राहकांच्या सोयीसाठी याच ठिकाणी प्रत्युषकुमार यांनी बोइंग इंडियाचे व्यावसायिक केंद्र विकसित केले. याच केंद्रामुळे बोइंग कंपनीला भारत सरकारबरोबर चिनूक, अ‍ॅपाची ही लढाऊ हेलिकॉप्टर, तसेच पी-८आय सागरी टेहेळणी विमानांचा व्यवहार करणे सुकर झाले. तांत्रिक नैपुण्याला व्यावहारिक उद्यमशीलतेची जोड दिल्यामुळे बोइंग कंपनीत प्रत्युषकुमार यांची प्रगती झाली. त्यांचे हे गुण बोइंग इंटरनॅशनलचे अध्यक्ष मार्क अ‍ॅलन यांनीही मान्य केले आहेत. काही वर्षांपूर्वी दिनेश केसकर या भारतीय अभियंत्याने बोइंगच्या प्रवासी विमान उद्योगाचा विस्तार भारतात नागपुरातील कार्गो हबच्या माध्यमातून केला होता. प्रत्युषकुमार यांनी बोइंगच्या अंतराळ व संरक्षण उद्योगाची वृद्धी भारतात करून दाखवली. एफ-१५ हे लढाऊ विमान मूळ मॅकडोनेल डग्लस कंपनीने चाळीस वर्षांपूर्वी विकसित केले. आजही ते अत्यंत घातक आणि अचूक म्हणून ओळखले जाते. अमेरिका सध्या हे विमान सौदी अरेबिया, इस्रायल आणि जपान या देशांना विकते.

ही विमाने घेण्याचा बेत नसल्याचे भारताने मागच्याच महिन्यात स्पष्ट केले असले, तरी प्रत्युषकुमारांच्या नेतृत्वाखाली भविष्यात ते भारतालाही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. लढाऊ विमानांच्या सध्याच्या ‘राफेलीकरणा’च्या वातावरणात आणि संरक्षणसामग्री विकण्यातील प्रत्युषकुमार यांची हातोटी पाहता, ही संभाव्यता स्वागतार्हच दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 2:42 am

Web Title: boeing india chief pratyush kumar profile
Next Stories
1 गिरीश पटेल
2 नटवरभाई ठक्कर
3 डॉ. लियोन लेडरमन
Just Now!
X