स्तनाच्या कर्करोगात आधी जे उपचार उपलब्ध होते ते फारसे प्रभावी नव्हते, त्यामुळे स्तन काढून टाकणे हाच एक उपाय उपलब्ध असताना त्यावर वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात ज्या अनेक संशोधकांचा हातभार होता त्यातील एक म्हणजे डॉ. बर्नार्ड फिशर. स्तन काढून टाकण्याची मास्टेक्टॉमी ही शस्त्रक्रि या आता शेवटचा उपाय म्हणून वापरली जाते. याचे श्रेय फिशर यांच्यासारख्यांना आहे. नुकतेच फिशर यांचे पीटसबर्ग येथे निधन झाले.

पीट्सबर्ग येथील विद्यापीठात शल्यविशारद म्हणून १९५० पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर चार दशके त्यांनी जे संशोधन केले त्यानुसार स्तनाच्या कर्करोगात आधीच्या अवस्थेत साध्या शस्त्रक्रिया करून उपचार करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. केमोथेरपी व संप्रेरक उपचारांना पूरक म्हणून या शस्त्रक्रियांचा वापर केला तर त्याचा चांगला उपयोग होतो असे त्यांचे मत होते. स्तन काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेत छातीच्या स्नायूंसह काही वेळा बरगडय़ाही कापून टाकल्या जात, इतका भयानक प्रकार पूर्वी होता. फिशर यांनी हे चित्र बदलून टाकले. जेवढय़ा जास्त शस्त्रक्रिया करू तेवढे रुग्णाला बरे वाटण्यास मदत होते असा ज्यांचा ठाम समज होता त्याला फिशर यांचा विरोध होता. त्यामुळे प्रस्थापितांनी त्यांच्यावर वैज्ञानिक गैरवर्तनाचा आरोप केला, पण त्याला पुरून उरत त्यांनी संशोधन सुरू ठेवले. अखेर, अमेरिकी काँग्रेसपुढे झालेल्या सुनावणीत त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. पीट्सबर्ग विद्यापीठ व नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट यांच्याकडून त्यांना खोटे आरोप केल्याबाबत ३० लाख डॉलर्सची भरपाई तर मिळालीच, शिवाय या संस्थांना माफी मागावी लागली होती. ‘स्तनाचा कर्करोग म्हणजे शस्त्रक्रिया’ या समीकरणामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होती ती फिशर यांनी बदलली. रुग्णाच्या वैद्यकीय चाचण्यांऐवजी केवळ मते, अशास्त्रीय माहितीवर विसंबून काम करणे त्यांना पसंत नव्हते. त्या अर्थाने फिशर हे खरे वैज्ञानिक होते. शस्त्रक्रियेनंतर टॅमेग्झिफेन हे औषध दिल्यास त्याचा बराच चांगला परिणाम दिसून येतो हे त्यांनी दाखवून दिले. इतर शल्यविशारदांनी त्यांच्याविरोधात जी मोहीम उघडली होती ती यशस्वी झाली असती तर कर्करोगातील उपचारात फार मोठे धोके व त्रुटी राहिल्या असत्या यात शंका नाही. फिशर यांना प्रतिष्ठेचा अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. स्वत:चे आयुष्य पणाला लावून त्यांनी महिलांची आयुष्ये सावरली.