03 August 2020

News Flash

बी. व्ही. परमेश्वर राव

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकदा अचानक त्यांना बोलावून घेतल्याने त्यांची विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

बी. व्ही. परमेश्वर राव

वैज्ञानिक व सामाजिक कार्यकर्ता असे मिश्रण खरे तर फार दुर्मीळच. त्यासाठी जगण्याची वेगळी तत्त्वे अंगीकारावी लागतात. गांधीवादी कार्यकर्ते बी. व्ही. परमेश्वर राव यांनी अणुशास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेत ऐषारामात जीवन जगण्याची संधी असताना त्याचा त्याग करून मायदेशाची वाट धरली. राव यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे आंध्र प्रदेशातील काही खेडय़ांना विकासाची दिशा दाखवणारा एक कर्मयोगी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

१९६०-७० या काळात अमेरिकेत अणुशास्त्रात पीएचडी केल्यावर त्यांना पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीकडून सहयोगी प्राध्यापक व दोन अमेरिकी कंपन्यांकडून नोकरीचा देकार होता. पण त्यांच्यात एक अवलिया लपलेला होता, त्याने त्यांना पुन्हा दिमली या त्यांच्या मूळ गावी परत आणले. येथे त्यांनी निरक्षर व वंचितांची सेवा सुरू केली. आतला आवाज स्वस्थ बसू देत नसल्यानेच ते मायदेशी आले. दिमलीत परतल्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये भगवत्तुला चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे बीसीटी ही संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून त्यांनी शाळा सुरू केली. दोन दशकांत त्यांनी पंचधारला हिल्स भागातील खडकाळ टेकडय़ा हिरव्यागार केल्या. वाकपाडू या भागाला नेहमी भरतीच्या लाटांचा मार बसत होता. तेथे आता कोळंबी उपज केंद्र आहे. मीठनिर्मितीही केली जाते. विशाखापट्टणम येथील ५० खेडय़ांतील लोकांचे प्राक्तन त्यांनी बदलून टाकले. महिलांना आर्थिक साक्षरता प्राप्त करून दिली. त्यामुळे कुटुंबांची स्थितीही सुधारली. साक्षरता, महिला प्रशिक्षण यात त्यांनी किमान हजारभर प्रकल्प राबवले. जागतिक बँक व भारत सरकारने त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकदा अचानक त्यांना बोलावून घेतल्याने त्यांची विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

ते गांधीवादी मूल्यांवर श्रद्धा ठेवून जगले, जे आजच्या काळात फार अवघड. त्यांच्या कामातून ग्रामीण भागातील अनेक तरुणांनाही प्रेरणा मिळाली हे विशेष. ‘जीवनात आपल्यासमोर अनेक कठीण पर्याय असतात. पण माझ्या मते हे पर्याय आपणच आपल्यासाठी अवघड करीत असतो. तुम्ही एकदा जीवनाची दिशा ठरवलीत, तर त्यामागे तुमची दृष्टी व ठामपणा असला पाहिजे.. मग सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होतात,’ असे त्यांचे म्हणणे होते. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2019 12:03 am

Web Title: bv parameswara rao profile
Next Stories
1 ल. सि. जाधव
2 अहमद इसोप
3 कमलाकर नाडकर्णी
Just Now!
X