आंध्रचे माजी मुख्यमंत्री व प्रसिद्ध अभिनेते एन. टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू चित्रपट राष्ट्रीय पातळीवर नेला तर तेलुगू गीतांची दखल राष्ट्रीय पातळीवर घ्यायला भाग पाडण्याचे काम केले ते सी. नारायण रेड्डी यांनी. ते ज्ञानपीठ विजेते लेखक व गीतकार होते. त्यांच्या निधनाने तामिळ साहित्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. त्यांना लोक प्रेमाने ‘सिनारे’ म्हणत असत. त्यांच्या निधनाने आधुनिक तेलुगू कविता मुकी झाली आहे.

‘गुलबकावली’ (१९६२) या चित्रपटातील गाण्यामुळे मोहून गेलेल्या गीत-संगीतप्रेमी पिढीला सिनारेंच्या जाण्याने धक्का बसला. अलीकडे त्यांचे ‘अरुंधती’ या चित्रपटातील (२००८) ‘जेजेमा जेगेमा’ हे गाणे आजही अनेकांच्या ओठांवर आहे. त्यांच्या गीतांना गेयता होती व ती गाणी सदैव लक्षात राहणारी होती. त्यामुळेच ते कवी व गीतकार म्हणून अमर राहतील यात शंका नाही. ‘प्रेमिंचू’ चित्रपटातील नायिका असलेल्या अंध मुलीची भावना व्यक्त करणारे गीत अनेकांची मने आजही हेलावते. १९८५ मधील ‘स्वाथी मुथायम’ या त्यांच्या चित्रपटातील ‘लाली, लाली लाली लाली लाली, वटपत्रा शायी की वहराला लाली राजीवा नेत्रुनिकी रतनाला लाली’ हे अंगाईगीत आजही आधुनिक माता सहज गुणगुणतात. ‘सिनारे’ यांनी ‘थल्ला पेल्लामा’ या चित्रपटासाठी असेच ‘तेलुगू जाथी मनाधी’ हे गाणे लिहिले. ‘सिनारे’ तेलंगणातले होते. तेलुगू प्रदेश एकच आहे असे ते मानत. आंध्रच्या विभाजनानंतर त्यांना कुणी तरी विचारले की, त्यांचे हे गाणे अजून खरे म्हणायचे का, त्यावर ते म्हणाले, ‘तेलुगू जाथी मनाधी. रेनगुडा वेलुगू जाथी मनाधी.’ तेलुगू प्रदेश एकच आहे असा त्याचा अर्थ. तेलुगू भाषेवर त्यांचे खूप प्रेम होते, केवळ प्रासावर, द्विअर्थी शब्दांवर भर न देता त्यांनी साहित्याची कसदार मांडणी केली. कविता, गीते, कथा हा त्यांचा प्रांत. १९६२ मध्ये ते तेलुगू चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी ‘गुलबकावली कथा’ या चित्रपटातील सगळी गाणी लिहिली व ती लोकप्रिय ठरली. १९७७ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले. त्यांच्या ‘विश्वंभरा’ या काव्यसंग्रहास १९८८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेलुगूला हा पुरस्कार मिळवून देणारे ते विश्वनाथ सत्यनारायण यांच्यानंतरचे दुसरे साहित्यिक. त्यांचा हा काव्यसंग्रह अनेक भाषांत अनुवादित झाला. ‘कला प्रपूर्ण’ ही आंध्र विद्यापीठाची मानद पदवी, राजलक्ष्मी पुरस्कार, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे सन्मान त्यांना मिळाले. १९९७ मध्ये ते राज्यसभेवर गेले.

आंध्रातल्या करीमनगर जिल्ह्य़ात २९ जुलै १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एमए व पीएचडी पदव्या घेतल्या. तेलुगू विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यांच्यावर उर्दू भाषा व साहित्याचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी सुशीला यांच्या नावाने महिला लेखिकांना पुरस्कार दिला जातो. अस्सल तेलुगूचा आग्रह धरताना त्यांनी चित्रपट निर्मात्यांचे वर्चस्व मान्य केले नाही. खरे तर निझामाच्या काळात जन्माला आल्याने तेलुगू शिक्षणाची सोय नसताना ते स्वत:हून तेलुगू शिकले होते. नंतर विद्यापीठामुळे त्यांना तेलुगू शिकण्याचा पर्याय मिळाला. ‘तेलुगूतील आधुनिक  परंपरा’ या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती पदवी घेतली. तेलुगू लोकपरंपरेतील बुराकथा या मौखिक कथाकथनातून ते सुरुवातीला चमकले होते. सुरुवातीला ते उस्मानिया विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात शिकले व नंतर निझाम महाविद्यालयात गेले. त्यांनी सुरुवातीला प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने तेलुगू भाषेवर प्रेम करणारा सरस्वतीपुत्र आता आपल्यातून गेला आहे.