आई ८४ तर तिची मुलगी ६० वर्षांची. निसर्गनियमानुसार खरे तर आईने अगोदर या जगाचा निरोप घ्यायला हवा, पण नियतीसुद्धा कधी कधी क्रूर थट्टा करते. ‘स्टार वॉर’ मालिकेतील चित्रपटांमुळे जगभरात पोहोचलेली हॉलीवूडची अभिनेत्री कॅरी फिशर हिला विमानातच हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यानंतर चार दिवसांतच रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवते.. आपली लाडकी कन्या आता या जगात नाही या कल्पनेनेच हादरून गेलेल्या तिच्या आईला हे दु:ख सहन होत नाही. हॉलीवूडचे ५० व  ६० चे दशक गाजवणारी बुजुर्ग अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स या घटनेच्या दुसऱ्या दिवशी लेकीला भेटण्यास जाण्यासाठीच जणू ईहलोकीची यात्रा संपवतात..

कॅरी फिशरने १९७५ मध्ये हॉलीवूडच्या दुनियेत प्रवेश केला. ‘श्ॉम्पो’ हा तिचा पहिला चित्रपट खूप गाजला. यानंतर ऑस्टीन पॉवर, द ब्लू ब्रदर्स, चार्लिज एंजल्स, व्हेन हॅरी मेट सॅली यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मात्र स्टार वॉर  मालिकेतील प्रिन्सेस लियाच्या भूमिकेने त्या खऱ्या अर्थाने जगभरात पोहोचल्या. या मालिकेत आतापर्यंत सात चित्रपट प्रदर्शित झाले असूून २०१७ आणि २०१९ मध्ये याचे उर्वरित दोन भाग सिनेप्रेमींना पाहायला मिळणार आहेत.

कॅरी ही केवळ अभिनेत्रीच नव्हती तर उत्तम लेखिकाही होती. पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज, डिल्युशन्स ऑफ ए ग्रॅण्डमा, द बेस्ट ऑफुल यांसारखी त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली. द प्रिन्सेस डायरिस्ट या तिच्या अखेरच्या पुस्तकात तिने हॅरिसन फोर्डसमवेतच्या प्रेमप्रकरणासह अनेक खळबळजनक घटनांची कबुली दिली आहे.

कॅरी फिशरची आई डेबी रेनॉल्ड्स यांचे मूळ नाव होते मेरी फ्रान्सिस रेनॉल्ड्स. थ्री लिटिल वर्ड्स या १९५० मध्ये आलेल्या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचे खूप कौतुक झाले. यातील अभिनयासाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकनही त्यांना मिळाले. संगीताची पाश्र्वभूमी असलेल्या सिंगिंग इन दे रेन हा नंतरचा त्यांचा चित्रपट चर्चिला गेल्याने आणि लगेच पॉप कलाकार एडी फिशर याच्याशी विवाहबद्ध झाल्याने डेबी या अमेरिकेत तुफान लोकप्रिय बनल्या. मात्र त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. फिशर नंतर तर एलिझाबेथ टेलरच्या प्रेमात पडल्याने डेबीपासून त्याने घटस्फोट घेतला. घटस्फोट झाला तरी  चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी त्या काम करत राहिल्या. गायनाचीही त्यांना आवड होती. लास वेगास येथे त्यांनी आलिशान हॉटेलही सुरू केले होते. १९६४ मध्ये आलेल्या ‘द अनसिंकेबल मोली ब्राऊन’ या यशस्वी ठरलेल्या व चित्रपटातील अप्रतिम अभिनयाबद्दल त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले होते.