News Flash

चेमन्चेरि कुन्हिरामन नायर

अनेक शिष्यांनी स्वत:ची गुरुकुलेही स्थापली. पण सीके नायर यांनी आपली गती-मती स्थिर ठेवून केवळ नृत्यसेवाच केली.

चेमन्चेरि कुन्हिरामन नायर

 

वयाची शंभरी गाठल्यानंतर, २०१७ मध्ये चेमन्चेरि कुन्हिरामन नायर यांना ‘पद्माश्री’ पुरस्कार मिळाला होता! कथकली या नृत्यप्रकारासाठी त्याआधी कलामंडलम गोपी, एम. वासुदेवन नायर, कीळपदम कुमार नायर अशा अनेकांना ‘पद्माश्री’ने गौरविण्यात आले होते आणि सी. कुन्हिरामन नायर यांना तो मिळण्यास तसा उशीरच झाला, पण खुद्द नायर यांना अशा पुरस्कारांचे सोयरसुतक नसे. ते कथकलीच्या तालमी घेण्यात, शिकवण्यात मग्न असत… अगदी शंभरी गाठल्यावरसुद्धा! अशा कलावंताचे वयाच्या १०५ व्या वर्षी झालेले निधन, हे केवळ एखाद्या कलाप्रकारातील नामवंताचे जाणे नसते, तर इतिहासाचे एक पान त्यासोबत मिटते.

चेमन्चेरि कुन्हिरामन नायर यांचा जन्म १९१६ सालचा. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना कथकलीची गोडी लागली आणि पुढल्याच वर्षी ते घर सोडून, गुरू करुणाकरन मेनन यांच्या कथकली पथकात दाखल झाले. दोन-तीन वर्षे उमेदवारी केल्यावर त्यांना भूमिका मिळू लागल्या, त्यांचे नावही होऊ लागले आणि वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी ‘भारतीय नाट्यकलालयम’ ही संस्था स्थापन केली. कथकली नृत्यप्रकाराचे धडे इतरांना देताना ते स्वत: भरतनाट्यम् शिकत होते, मोहिनीअट्टम या केरळच्या नृत्यप्रकाराचाही अभ्यास करीत होते. सोबतच, कथकली आख्याननाट्यांमध्ये भूमिकाही करीत होते. यापैकी कृष्णाची भूमिका त्यांची हातखंडा मानली जाई. अगदी उतारवयातही ते कृष्ण म्हणून उभे राहिले आणि पदलालित्याची शक्यताही नसताना, निव्वळ मुद्राभिनयाने त्यांनी रसिकांची मने पुन्हा जिंकली! या ‘कृष्ण’ प्रतिमेचा वापर केरळात कृष्णजन्माष्टमीच्या राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न एका राजकीय पक्षाने आरंभला होता. पण गुरू ‘सीके’ ऊर्फ चेमन्चेरि कुन्हिरामन नायर हे या असल्या राजकारणाच्या पलीकडे गेले होते. त्यांच्या शिष्यांपैकी विनीत राधाकृष्णन यांनी पुढे मल्याळम् चित्रपटक्षेत्रात नाव कमावले. अनेक शिष्यांनी स्वत:ची गुरुकुलेही स्थापली. पण सीके नायर यांनी आपली गती-मती स्थिर ठेवून केवळ नृत्यसेवाच केली. मोहिनीअट्टम व कथकली यांच्या मिश्रणातून त्यांनी ‘केरल-नटनम्’ हा नवा नृत्यप्रकार जन्मास आणला होता. जयदेवाच्या ‘गीतगोविंद’मधील अष्टपदीवर नृत्य करणे ही एरवी ओडिसी नृत्यशैलीची मिरास, पण या अष्टपदींना ‘केरल-नटनम्’ शैलीतही सीके नायर यांनी स्थान दिले. त्यांनी पुस्तके लिहिली नाहीत, पण नृत्यशैलींच्या संशोधनाची मौखिक परंपरा जिवंत ठेवली. या संशोधकवृत्तीचा लाभ पुढल्या दोन पिढ्यांना झाला, म्हणून ते खऱ्या अर्थाने ‘गुरू’ ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:01 am

Web Title: chemancheri kunhiraman nair profile abn 97
Next Stories
1 लक्ष्मण पै
2 शिशिरकना धर चौधरी
3 भास्कर मेनन
Just Now!
X