News Flash

राजीव सातव

गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले व भाजपला १००च्या आत रोखले.

काँग्रेस नेत्यांच्या प्रस्थापित चौकटीला थेट हादरा न देता आपल्या-नव्या- कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याची वाट चोखाळणारा युवा नेता अशी राजीव सातव यांची राजकीय पटलावरची ओळख.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राज्यात यश मिळालेल्या नांदेड व हिंगोलीच्या दोन जागांपैकी एकीवर सातव यांचा विजय नेहमीच कौतुकाचा विषय  राहिला. जनमत व राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाशी जवळीक यामुळे सातव यांचे राजकीय वजन उंचीही गाठत असताना, त्यांना करोनाने गाठले, त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे उमदे नेतृत्व हरविल्याची भावना सर्वत्र आहे.

काँग्रेसची संघटनात्मक बांधणी नव्याने व्हायला हवी अशी मांडणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर करू लागले होते. प्रत्येक जिल्ह्यात युवक काँग्रेस संमेलन होऊ लागले. संघटनात्मक निवडणुका कार्यकर्ते मतदानाने करू लागले अशा काळात राजीव सातव आणि राहुल गांधी यांची भेट झाली. मूळ काँग्रेसनेते व युवा काँग्रेसचा कार्यकर्ता अशी संघटनात्मक पर्यायी फळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा सातव यांची राष्ट्रीय पातळीवर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवे वळण देण्याचा प्रयत्न सातव यांनी केला. जेव्हा काँग्रेस हा ‘नेत्यांचा पक्ष’ अशी प्रतिमा होती तेव्हा त्यात अधिक सजगपणे कार्यकर्तेही हवेत, या विचारांना पुढे नेणारा नेता, अशी सातव यांची ओळख होती. सरपंचपद, पंचायत समिती सदस्यत्व या निवडणुका अधिक अवघड असतात. कारण प्रत्येकाला उमेदवार माहीत असतो. त्या पुढच्या टप्प्यावरच्या म्हणजे जिल्हा परिषदेपासून पुढील निवडणुका प्रतिमा संवर्धनाच्या आधारे लढविता येतात. विधि शाखेतील पदवीधर असणाऱ्या सातव यांनी कारकीर्दीची सुरुवात माणसे जोडत पंचायत समितीपासून केली. समाजकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या विहिरीवरच्या मोटारीच्या लाभापासून ते देशपातळीवरच्या सर्व प्रश्नांवरची माहिती असणारा नेता अशी सातव यांची प्रतिमा होती. २००२ पासून राजकारणातील बारकावे समजून घेताना आणि कार्यकर्ते — प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबर सभ्यपणाने कसे वागावे हे ते कृतीतून दाखवून देत. राजकारणातील व्यक्तीला हेवेदावे, उणीदुणी याची सवय असते. पण कोणत्याही वादापासून लांब राहत काम कसे करावे, टीका करतानाही किती संयम बाळगावा याचे भान सातव यांचे राजकारण पाहिल्यावर कळे. निवडणुकीच्या राजकारणात यश मिळत असूनही त्यांनी संघटनाबांधणीसाठी २०१९ ची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले व भाजपला १००च्या आत रोखले.  चिकाटीने कार्यकर्ते जोडणारा, बडय़ा नेत्यांना न दुखावताही पुढे जाणारा असा एक नेमस्त  नेता ही राजीव सातव यांची ओळख कायम राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:11 am

Web Title: congress leader rajeev satav zws 70
Next Stories
1 व्ही. चंद्रशेखर
2 प्रेरणा राणे
3 गौरी अम्मा
Just Now!
X