दृश्यकलेचे प्रयोग करत, लोकप्रियतेसाठी तत्त्वांशी तडजोड न करता नलिनी मलानी यांनी वयाच्या पन्नाशीपर्यंत संघर्षच केला. त्यांना मोठय़ा संधी मिळाल्या, त्या साऱ्या १९९६ मध्ये अथवा नंतर. ‘व्हिडीओ-कला’ आणि ‘व्हिडीओ-मांडणशिल्प’ या प्रकारांत काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय कलावंतांपैकी त्या महत्त्वाच्या ठरल्या, पुढे जर्मनीतील ‘डॉक्युमेंट’सह अनेक प्रतिष्ठेच्या कलाप्रदर्शनांमध्ये त्यांचा समावेश झाला.. आणि आता, ‘कलेतील प्रयोगशीलता, शोधक वृत्ती, सातत्य आणि स्वातंत्र्याची जपणूक’ यांसाठी जीवनगौरव म्हणून दिला जाणारा, ७० हजार युरो (सुमारे ५४.४७ लाख रुपये) ‘ज्याँ मिरो पुरस्कार’ मलानी यांना मिळाला आहे! मराठी चित्रकला-रसिकांना मलानी यांचे नाव समजा माहीत नसले, तरी ज्याँ मिरो (१८९३-१९८३) या स्पॅनिश चित्रकाराची ओळख कलेतिहासाच्या पुस्तकांतून असते. कराचीत १९४६ मध्ये जन्मलेल्या नलिनी यांना घेऊन, फाळणीपूर्वीच मलानी कुटुंबीय कोलकात्यास आले आणि १९५४ पासून मुंबईत राहू लागले. इथेच १९६४ ते ६९ या काळात ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये त्या शिकल्या आणि मुंबईच्या कलेतिहासाचा मानबिंदू ठरलेल्या ‘भुलाभाई इन्स्टिटय़ूट’मध्ये याच काळात त्यांना स्टुडिओही मिळाला. १९७० ते ७२ फ्रान्समध्ये राहून शिकण्यासाठी फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती आणि पुढे १९८४ मध्ये ललित कला अकादमीची फेलोशिप कारकीर्द पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरले. त्या काळात कौटुंबिक, सामाजिक प्रसंगांची चित्रे करताना स्त्री-व्यक्तिरेखांवर नलिनी भर देत. पुढे के जी सुब्रमणियन यांच्यामुळे काच वा पस्र्पेक्सवर मागल्या बाजूने चित्रे रंगवण्याचा ध्यास त्यांनी घेतला, त्यात सुब्रमणियन यांच्यापेक्षा निराळे प्रयोग केले. यातूनच मॅक्समुलल्लर भवनासाठी बट्रेल्ट ब्रेख्तच्या ‘द जॉब’या नाटकाचे नेपथ्यही त्यांनी साकारले होते. कॅनव्हासच्या चौकटीबाहेरचा अवकाश हाताळणेच मग त्यांनी पसंत केले. व्हिडीओ हे भारतात नवमाध्यम असताना, ‘तोबा तेक सिंग’ हे प्रचंड मोठे व्हिडीओ मांडणशिल्प त्यांच्या कल्पनेतून साकारले. लेखक सआदत हसन मण्टो यांच्या, फाळणीनंतर दोन देशांत विभागले गेल्याच्या जाणिवेला आकार देणारे हे मांडणशिल्प होते आणि त्यात स्त्रिया, स्थलांतरित यांची वेदनाही होती. पाश्र्वभूमीवर आवाज, त्यातून सांगितली जाणारी गोष्ट आणि समोर हलती दृश्ये यांचा वापर पुढेही नलिनी यांनी विविध प्रकारे केला. काचेसारख्या पस्र्पेक्सचे पिंपासारखे दंडगोलाकार करून त्यांवर काढलेली चित्रे, या चित्रांवर एकाच बाजूने प्रकाशझोत आल्यास मागच्या भिंतीवर आकृतीच्या बाह्य़ाकाराचीच पडणारी काळी सावली, या सावलीच्या मागे पुन्हा भिंतभर व्हिडीओ असे निराळ्याच दृश्यविश्वात नेणारे प्रयोग करताना, राजकीय-सामाजिक आशयाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.