सन २००९ मध्ये भारतातील आर्थिक क्षेत्राला धक्का बसला तो सत्यम कॉम्प्युटर प्रकरणामुळे, बी.रामलिंग राजू यांनी कंपनीच्या नफ्याचे आकडे फुगवून गैरप्रकार केला, त्यांना अटकही झाली.  नंतर आनंद महिंद्र यांनी त्याच वर्षी एप्रिलमध्ये ही कंपनी घेतली, पण कंपनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर नेतृत्व कणखर हवे होते, म्हणून त्यांनी सीपी गुरनानी यांना पाचारण केले. त्या वेळी ते टेक महिंद्रचे आंतरराष्ट्रीय प्रमुख होते. सीपींनी विश्वास सार्थ ठरवला. महिंद्र सत्यमने पुन्हा नावलौकिक मिळवला. गुरनानी यांचे नेतृत्वगुण आता त्यांना नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सव्‍‌र्हिसेस कंपनीज) या संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन आले आहेत.

सीपींचा आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवस्थापनातील अनुभव मोठा आहेच, शिवाय त्यांनी नेहमीच उद्योग क्षेत्राला सकारात्मक दिशेने नेले आहे. आता जगात आर्थिक अडचणींचे वारे असताना आव्हानात्मक स्थितीत ते नॅसकॉमचे अध्यक्ष झाले आहेत. स्टार्टअप, स्टँडअप, मेक इन इंडिया या सगळ्या गलबल्यात उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करताना त्यांच्यासारख्या व्यक्तीची निवड ही सयुक्तिकच आहे. आव्हाने नसतील तर मग या जगात स्वारस्यच उरणार नाही असे ते सांगतात. गेली बावीस वर्षे ते उद्योग क्षेत्रात काम करीत आहेत. एचसीएल ह्य़ूलेट पॅकार्ड लिमिटेड, पेरॉट सिस्टीम्स (इंडिया) लिमिटेड व एचसीएल कार्पोरेशन लिमिटेड अशा अनेक कंपन्यांत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी या क्षेत्रात काम करताना मित्र, सहकारी, ग्राहक यांची विश्वासू फळी उभी केली. लोक त्यांना सीपी नावानेच ओळखतात. प्रत्येक कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत संपर्क  ठेवतात. आजही ते तितक्याच तडफेने काम करीत आहेत.

सीपींचा जन्म मध्यप्रदेशातील निमच या छोटय़ा गावात मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यांचे वडील सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स या संस्थेत अधिकारी होते, ती बदलीची नोकरी होती. त्यामुळे त्यांचे शिक्षण राजस्थानातील चितोडगड, कोटा, जयपूर येथे झाले. राउरकेला येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतली, सध्या ते नोइडात राहतात.  नेतृत्वगुण ही त्यांना लाभलेली देणगी आहे, लोकांचे ते प्रेरणास्थान आहेत. त्यांना पुरस्कार तर अनेक मिळाले, पण त्यांच्या कन्येच्या विवाहाला त्यांच्या बालपणीपासूनची मित्रमंडळी आली होती, तो क्षण या पुरस्कारांपेक्षा मोठा होता असे ते सांगतात तेव्हा त्यांच्यातला माणूस कळतो. महिन्यातून दहा दिवस ते नोइडात काम करतात व उर्वरित दिवस देश व परदेशातील कार्यालयांना भेटी देतात तीच काय ती त्यांची विश्रांती. नॅसकॉमची धुरा सांभाळल्यानंतर त्यांना माहिती तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांतील वाढीच्या अंदाजाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांचे म्हणणे सकारात्मकच आहे. त्यांच्या मते ही वाढ चांगलीच राहणार आहे. जगात तुम्हाला स्थान नसते, तुम्हाला ते निर्माण करावे लागते हे त्यांचे तत्त्वज्ञान इथेही लागू आहे इतकेच.