‘स्कॉटलंड यार्ड’ अर्थात लंडनच्या ‘मेट्रोपोलिटन पोलीस सव्‍‌र्हिस’ या जगद्विख्यात पथकाचे नेतृत्व तब्बल १८७ वर्षांनंतर एका महिलेकडे आले आहे. क्रेसिडा डिक यांचा समावेश ‘ऑफिसर’ म्हणून १९८३ साली झाला, तोवर या पथकात एकही महिला अधिकारीसुद्धा नव्हती (भारतात, किरण बेदी १९७२ बॅचच्या ‘आयपीएस’ आहेत). त्याच क्रेसिडा डिक आता ५६ वर्षांच्या असताना, स्कॉटलंड यार्डच्या प्रमुखपदी त्यांची निवड बुधवारी जाहीर झाली.

पोलीस अधिकारीपदाच्या गेल्या तीन दशकांत क्रेसिडा यांनी अनेक अनुभव घेतले आहेत, अनेकदा अभिनंदनास्पद कामगिरी केली आहे आणि क्वचित टीकेचे- अगदी कारकीर्द डागाळण्याचे- प्रसंग झेलूनसुद्धा त्यातून त्या तावूनसुलाखून बाहेर पडल्या आहेत.. तसा हा एकच प्रसंग, कारकीर्द डागाळणारा. लंडनमध्ये २००५ साली ‘७/७’चा बॉम्बहल्ला झाल्यावर संशयित दहशतवादय़ांना वेचून काढण्याचे काम सुरू झाले. या कामी क्रेसिडा यांच्याकडे ‘गोल्ड कमांडर’ची जबाबदारी होती. दक्षिण लंडनच्या तुल्ज हिल भागातील अमुक इमारतीत संशयित राहतो, हे समजताच क्रेसिडा यांनी पथकाला त्यास पकडण्याचे आदेश दिले; पण पथक इमारतीबाहेर असतानाच तेथून ज्याँ चार्ल्स डि मेनेझिस बाहेर पडला, पोलीस पाहून पळतच सुटला आणि थेट भुयारी रेल्वे स्थानकात घुसला. तेथेही पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला बंदुकीने छिन्न-निश्चेष्ट केले; पण पुढे मेनेझिस हा संशयित नसून निरपराध रहिवासी होता, हे उघड झाले. न्यायालयीन खटल्यातून सुटण्यासाठी क्रेसिडा यांना, ‘माझे आदेश गोळीबाराचे नव्हते’, ही तांत्रिक बाब उपयोगी ठरली; पण अशाने कीर्तीला लागलेला डाग कसा पुसणार?

तोही पुसण्याची संधी लगोलग मिळाली. १९९३ साली शाळेत स्टीफन लॉरेन्स या कृष्णवर्णीय मुलाची हत्या करूनही ‘पुराव्याअभावी’ मोकळे राहिलेल्या दोघा गौरवर्णीय मुलांविरुद्ध अखेर २०११ साली सज्जड पुरावा जमवून त्यांना शिक्षेपर्यंत नेण्याचे काम क्रेसिडा यांच्या तपासकौशल्यामुळे झाले. वंशभेदाचा लंडनवरला एक डागही यामुळे पुसला गेला.

ऑक्सफर्डमध्येच १९६० साली जन्म, ११ वर्षांची असताना अध्यापक वडिलांचा मृत्यू, आईदेखील ऑक्सफर्डच्या ज्ञानक्षेत्रातच कार्यरत असल्याने तेथेच शिक्षण आणि  वयाच्या २३ व्या वर्षी  स्कॉटलंड यार्डमध्ये अधिकारी म्हणून प्रवेश.. इथवरचा त्यांचा प्रवास सामान्य स्त्रीसारखाच असला तरी पहिल्याच महिला पोलीस अधिकारी म्हणून पुरुषांशी तुलना होण्याच्या कसोटीची पुढली दहा वर्षे त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. केम्ब्रिजमध्ये गुन्हेशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करून २००१ मध्ये त्यांनी आणखी मोठी पदे मिळविली आणि मुख्य म्हणजे, लंडनमध्ये बोकाळलेल्या बंदूकधारी- अमली पदार्थ विक्रेत्या टोळ्यांचा नायनाट तसेच दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद (२०१४ पर्यंत) सांभाळताना दहशतवाद खरोखरच काबूत ठेवणे यांसारख्या उत्तुंग कामगिऱ्याही केल्या. गुन्हे उकलून काढणे, पुरावे जमा करणे आणि गुन्हेगारांना जिवंत पकडून कायद्यानुसार शिक्षा भोगण्यास भाग पाडणे, ही तिन्ही पोलिसी कौशल्ये त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली.  सध्या परराष्ट्र आणि राष्ट्रकुल खात्यात त्या अधिकारी होत्या. तेथून त्यांना लंडनच्या पोलीसप्रमुखपदी आणण्याची चक्रे फिरली ती पंतप्रधान थेरेहा मे या १९९७ मध्ये खासदार असतानापासून त्यांच्या परिचित असल्याने, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात, ४० कोटी पौंडांच्या निधीची तूट, त्यामुळे कमी मनुष्यबळ, अशाही आव्हानांशी क्रेसिडा यांना सामना करावा लागेल.