वेस्ट इंडिज हा संघ द्रुतगती गोलंदाजांचा खजिना समजला जातो. अलीकडच्या काळात त्यांच्याकडे आग ओकणारा तोफखाना राहिलेला नाही, मात्र साधारणपणे १९५० ते १९८० या कालावधीत विंडीजच्या गोलंदाजांनी जगावर राज्य केले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मात्र या गोलंदाजांनाही पुरून उरणारे काही फलंदाज घडले. पाकिस्तानचे हनिफ महंमद या महान फलंदाजांमध्ये ओळखले जातात.

पाकिस्तान संघाकडून महंमद हनिफ, मुश्ताक, सादिक व वझीर या सख्ख्या भावांनी एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट क्षेत्रात आपला वरचष्मा निर्माण केला होता. हनिफ हे संयमी व चिवट वृत्तीने फलंदाजी करण्याबाबत ख्यातनाम होते. सर गारफिल्ड सोबर्स यांच्यासह अनेक रथीमहारथी असलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध हनिफ  यांनी ब्रिजटाऊन येथे १९५८ मध्ये एकाच डावात त्रिशतक झळकावीत विक्रमी कामगिरी केली होती. हे त्रिशतक टोलविताना त्यांनी ९७० मिनिटे खेळपट्टीवर काढली. हल्लीच्या काळात झटपट क्रिकेटमुळे ७० मिनिटे खेळणेदेखील अनेकांना जमत नाही. हनिफ यांनी विंडीजच्या अनेक द्रुतगती गोलंदाजांचा तिखट मारा लीलया सहन करीत ही कामगिरी केली. ही कामगिरी करताना त्यांनी चार फलंदाजांसमवेत शतकी भागीदारी केली. त्यापैकी एक भागीदारी त्यांनी वझीरच्या समवेत केली. हनिफ यांची ही खेळी अतिशय संस्मरणीय ठरली, कारण पहिल्या डावात विंडीजच्या ५७९ धावांना उत्तर देताना पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांमध्ये कोसळला होता. साहजिकच त्यांच्या संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढविली. संघाचा पराभव टाळण्याची मोठी जबाबदारी हनिफ यांच्यावर आली. ते सलामीस खेळावयास गेले होते. आपल्यावर आलेली जबाबदारी पेलविताना त्यांनी जिद्दीने व अतिशय शांतचित्ताने फलंदाजी केली. त्यांच्या या फलंदाजीमुळे पाकिस्तानने दुसऱ्या डावात ६०० धावांपलीकडे मजल मारली. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव टळला. त्यांनी केलेला ३३७ धावांचा विक्रम बराच काळ मोडला गेला नव्हता. हनिफ यांची ही फलंदाजी नशिबाच्या जोरावर नव्हती हे अनेक वेळा दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी प्रथम दर्जाच्या स्थानिक सामन्यात बहावलपूर विरुद्ध कराची संघाकडून खेळताना एकाच डावात ४९९ धावा केल्या होत्या. पाचशेवी धाव काढताना ते धावबाद झाले, अन्यथा एक आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला असता. हनिफ यांच्या फलंदाजीत जबरदस्त आत्मविश्वास, संयम, धडाडीने खेळण्याची वृत्ती होती. एकाच डावात जवळजवळ एक हजार मिनिटे खेळपट्टीवर उभे राहणे हीच कमालीची शैली आहे. हल्लीच्या फलंदाजांना अनेक सुविधा मिळतात, तशा सुविधा नसताना अशी खेळी करणे हा खरोखरीच एक चमत्कारच होता. केवळ पाकिस्तानच्या नव्हे तर अन्य देशांच्या फलंदाजांसाठीही ते आदर्श फलंदाज होते.

हनिफ यांनी या जगाचा नुकताच निरोप घेतला असला तरी  चिकाटीने खेळण्याची त्यांची वृत्ती चिरकाल स्मरणात राहील.