जर्मनीने त्यांच्या संसदेच्या- राइशस्टागच्या- इमारतीची प्रतिष्ठा आणि डौल कायम ठेवून हीच इमारत अत्याधुनिक व अवाढव्य केली याची आठवण जगभर आजही काढली जाते; तेव्हा अनेकांना आणखीही एक आठवण येते :    १९९५ मध्ये, म्हणजे नूतनीकरणापूर्वी,  १५४ फूट (४७ मीटर) उंचीच्या त्या जुन्या वास्तूला झळाळत्या कापडात बांधून ठेवण्याची ‘कलाकृती’ क्रिस्टो आणि त्यांची सहचरी जीन क्लॉद यांनी केली होती! गतकाळ जणू बासनात बांधला जावा, असे ते दृश्य होते. हे क्रिस्टो भारतीय कलाप्रेमींना माहीत असतात, ते विशेषत: ‘राइशस्टागचे आवरण’ आणि ‘गुलाबी बेटे’ या दोन कलाकृतींसाठी. पण कलेतिहासाच्या पुस्तकांत न मावणाऱ्या कित्येक कलाकृती त्यांनी केल्या. नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्नीवियोगानंतरही त्यांनी एक कलाकृती केली- लंडनच्या र्सपटाइन तलावात ७,५०६ तेलाचे बुधले (बॅरल) वापरून कबरीसारखा आकार तयार केला. ही तरंगती कबर गुलाबी रंगाच्या बॅरल वापरल्याने आकर्षक दिसली, तरी तेलाची मागणी किती राक्षसी आहे, याचा प्रत्यय या महाकाय मांडणशिल्पातून येई.

हे क्रिस्टो निवर्तले. निधनवार्ता सोमवारी आली, तेव्हा भारतातही अनेक कलाप्रेमी हळहळले. अचाट काहीतरी करणारा मनस्वी कलावंत गेला, म्हणून! पण क्रिस्टो यांची ओळख अचाटपणाच्या पलीकडली होती. भूभाग, भूदृश्यांची वैशिष्टय़े व मानवी संवेदना यांची सांधेजोड किती निराळय़ा पद्धतीने करता येऊ शकते, याचा शोध घेणारे दृश्य-संशोधकच होते ते. जीन क्लॉद याही चित्रकार, १९५८ पासून जोडीदार. कोणतीही कलाकृती करण्यापूर्वी क्रिस्टो शेकडो ड्रॉइंग्ज काढत. तीही जेथे काम करायचे, त्या भूभागाच्या मापाबरहुकूम असत. क्रिस्टो यांची ही आरेखने, आराखडे व काही ‘मॉडेल्स’ (प्रतिरूपे) हल्ली महागमोलाने विकली जात. पण १९३५  साली बल्गेरियात जन्मलेले आणि १९५७ पासून पॅरिसमध्ये शिकताना संकल्पनात्मक कलेकडे आकृष्ट झालेले क्रिस्टो हे मुळात, कलेचा बाजार मांडण्याविरुद्ध होते! १९६८ सालच्या ‘डॉक्युमेंटा’ महाप्रदर्शनात त्यांची ‘हवेचे आवरण’ ही (प्रचंड उंच फुग्यासारखी) कलाकृती प्रदर्शित झाल्यावर त्यांचा बोलबाला वाढला. मग ऑस्ट्रेलियातील सिडनी नजीकचा २.४ कि.मी.चा समुद्रकिनारा त्यांनी प्रचंड कापडाने झाकला.. मानवी अतिक्रमण नको, हे त्यातून अधोरेखित झाले. क्रिस्टो व जीन क्लॉद यांनी निसर्गात कापडाच्या वापराने अनेक कलाकृती केल्या, त्यांना ‘पर्यावरणशिल्पे’ म्हटले जाते. जीन क्लॉद यांच्या निधनानंतरही, २०२१च्या सप्टेंबरात पॅरिसच्या ‘आर्क द त्रायुम्फ’ला कापडाने अवगुंठित केले जाणार आहे.. हे शिल्प त्यांनी १९६२ मध्ये संकल्पित केले होते.