अमेरिकेचे माजी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या काळात, म्हणजे १९६७ साली, मिशिगन जिल्हा न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. निवृत्ती न स्वीकारता तब्बल ५२ वर्षे त्यांनी विविध न्यायालयांत न्यायदानाचे काम करताना नागरी हक्क आणि नागरी स्वातंत्र्याची जपणूकच केली. मात्र माझ्या आयुष्यात असा एकही दिवस उगवला नाही, ज्या दिवशी मी कृष्णवर्णीय आहे, याची जाणीव मला करून देण्यात आली नाही, ही खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत होती. अमेरिकी न्यायपालिकेत सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या त्या असामान्य व्यक्तीचे नाव होते डॅमन जे. कीथ!

अमेरिकेच्या डेट्रॉइट प्रांतात त्यांचा जन्म झाला. पदवी प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान (१९४३ ते ४६) त्यांनी अमेरिकी सैन्यदलात काम केले. पुढे मग कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते हार्वर्डला गेले. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी डेट्रॉइट येथेच वकिली व्यवसायाचा प्रारंभ केला. काही कालावधीतच एक यशस्वी वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. १९६४ मध्ये डेट्रॉइट येथे वर्णद्वेषातून दंगल उसळली. यामुळे अस्वस्थ झालेल्या कीथ यांनी नागरी स्वातंत्र्य आणि हक्कांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. पुढे मग मिशिगन मानवी हक्क आयोगाची स्थापना झाल्यावर त्यांची त्यावर नियुक्ती करण्यात आली. पुढे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी कीथ यांची नेमणूक मिशिगन जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली. १९७५ मध्ये त्याच न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश बनले. पुढे जिमी कार्टर हे अध्यक्ष बनल्यावर कीथ यांची सचोटी पाहून त्यांना वरिष्ठ न्यायालयात  बढती देण्यात आली.  अध्यक्ष निक्सन यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली असतानाच्या काळात कीथ यांनी आपला स्वतंत्र बाणा जपला होता. त्यांच्यासमोर व्हाइट पँथर आर्मीच्या तीन नेत्यांचे प्रकरण सुनावणीस आले होते. युद्धविरोधी तसेच वर्णद्वेषविरोधी असलेला हा गट  होता. या तीन नेत्यांवर सरकारी मालमत्तेचा विध्वंस करण्याचा कट रचल्याचा आरोप होता. ही मंडळी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन वॉरन्ट नसताना त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न कीथ यांनी हाणून पाडला. हे प्रकरण त्या काळी खूप गाजले होते. वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मारण्याच्या धमक्या अनेकदा देण्यात आल्या. पण त्याची पर्वा न करता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. मंगळवारी ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अमेरिकी न्यायपालिकेत त्यांनी उमटवलेला ठसा कायम स्मरणात राहील.