खाद्य व अखाद्य तेलांपासून जैव इंधनाची निर्मिती करण्याच्या रासायनिक प्रक्रियेत सुधारणा घडवून उत्पादन खर्च कमी करण्यात यशस्वी ठरलेले वैज्ञानिक डॉ. दर्भ श्रीनिवास यांना यंदा वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचा (सीएसआयआर) तंत्रज्ञान पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. श्रीनिवास हे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) संशोधन करीत आहेत. ते आंध्र प्रदेशातील असून त्यांचा जन्म २४ मे १९५८ रोजी तेनाली येथे झाला. गुडीवाडा येथील अकिनेनी नागेश्वरराव महाविद्यालयातून ते विज्ञानाचे पदवीधर झाले. त्यानंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. चेन्नईच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेतून (आयआयटी) त्यांनी पीएच.डी. मिळविली. गुजरातेत भावनगरच्या सेंट्रल सॉल्ट अँड मरिन केमिकल्स रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम केल्यावर १९९८ पासून ते एनसीएलमध्ये आहेत. बहुवारिके व जैव इंधनाच्या निर्मितीत घन उत्प्रेरकांचा वापर, जैव वंगणे यावर त्यांचे संशोधन आहे. २००८ पासून किफायतशीर तंत्राने जैव डिझेल तयार करण्यासाठी एनसीएलने श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प सुरू केला. या संशोधनात अमेरिकेतील न्यू सेंच्युरी ल्युब्रिकंट्स या नवोद्योगानेही स्वारस्य दाखवले. दुहेरी धातू घटकाचा वापर घन उत्प्रेरक म्हणून केला असता जैव डिझेल किफायतशीर किमतीत तयार करता येते. आधी यात हायड्रॉक्साइडवर आधारित उत्प्रेरकांचा वापर केला जात होता. जैव डिझेल पूर्वी ४० रुपये लिटर होते, आता त्याची किंमत २७ रुपये लिटर इतकी खाली आणण्यात श्रीनिवास यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. ऑक्टॅनॉलसारखी जैव वंगणे तयार करण्याची पद्धतही त्यांनी शोधून काढली आहे. जैव वंगणाची बाजारपेठ कमी असली, तरी त्यात जैव डिझेलपेक्षा नफा अधिक आहे, असे श्रीनिवास यांचे म्हणणे आहे. एनसीएलने घन उत्प्रेरक वापरून जैव इंधन तयार करण्याचा प्रयोग खाद्य व अखाद्य अशा १३ प्रकारच्या तेलांवर यशस्वी केला आहे. श्रीनिवास यांनी जैव इंधनासाठी एन्सेल ही प्रक्रिया शोधली असून जपानमधील मातसुयामो व अमेरिकेच्या युलिस कंपनीने ती स्वीकारली आहे. नेहमीच्या पद्धतीपेक्षा यात जैव डिझेलचे उत्पादन दोन ते तीन टक्क्यांनी वाढते. श्रीनिवास हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादक मंडळावर असून त्यांना ६० परदेशी व २५ भारतीय पेटंट मिळाली आहेत.