News Flash

दत्ता देसाई

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजासाठी विधायक कामे करणाऱ्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजासाठी विधायक कामे करणाऱ्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. नोकरीच्या बंधनात राहून हे काम करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर लठ्ठ पगाराची नोकरी सोडून गेली ३०हून अधिक वर्षे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आदिवासी, स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते व लेखक दत्ता देसाई राज्यात सुपरिचित आहेत. यंदाचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार देसाई यांना जाहीर झाला असून पुढच्या शुक्रवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नगर येथे समारंभपूर्वक तो प्रदान केला जाणार आहे.
१४ एप्रिल १९५६ रोजी जन्मलेल्या देसाई यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळ टेलिफोन खात्यात नोकरी केली. नंतर महाराष्ट्र व आंध्र बॅँकेत त्यांची निवड झाली. तेथे उपशाखाव्यवस्थापक पदापर्यंत ते पोहोचले. पण समाजकार्याची आवड असल्याने १९८३ मध्ये बॅँकेच्या नोकरीला त्यांनी रामराम ठोकला. पुणे येथील समाज विज्ञान अकादमीत त्यांनी दीर्घकाळ पूर्ण वेळ सचिव म्हणून काम केले. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील २५ जिल्ह्य़ांमध्ये विद्यार्थी-युवक, कामगार-कर्मचारी, शेतकरी, महिला तसेच सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास व प्रशिक्षण शिबिरे त्यांनी आयोजित केली.
भारत ज्ञानविज्ञान समिती व भारतीय जनविज्ञान आंदोलन या माध्यमांतून साक्षरता, जनवाचन आंदोलन, समता विज्ञान आंदोलन, शिक्षण हक्क चळवळ, आरोग्य साक्षरता, पर्यावरण या क्षेत्रांत देसाई यांनी बहुमोल काम केले. लोक वैज्ञानिक दुष्काळ निर्मूलन व्यासपीठाचे ते सह-समन्वयक होते तर सर्वासाठी आरोग्य या आंतररराष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत जन आरोग्य अभियानाचे ते राज्य समन्वयक होते. जल व सिंचन धोरणे व हक्कविषयक समिती, महाराष्ट्र शिक्षण हक्क समिती, अन्न हक्क समितीवर काम करतानाही त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून आली. विविध क्षेत्रांत काम करताना त्यांचे लिखाणही सुरू असते. ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’, ‘जलयुद्ध की क्रांती?’, ‘महाराष्ट्रातील विकासाची दिशा : हवी नवी मळवाट’, ‘आधुनिकतेचे आगमन : युरोपकेंद्री इतिहासाचा जागतिक विचार’ ही त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके त्यांच्या व्यासंगाची साक्ष देतात. चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी बुवाबाजीवर प्रकाशझोत, भारतीय शेती आणि डंकेल नीती, गोवंश हत्याबंदी, पेटंट मक्तेदारी, पाणी, दुष्काळ आणि विकास यांसारख्या अनेक पुस्तिकाही लिहिल्या. तसेच काही ग्रंथांचे सहलेखन तर काहींचे संपादन केले. शहीद भगतसिंगांवरील त्यांच्या अनुवादित पुस्तकाची साहित्य वर्तुळात खूप चर्चा झाली. सामाजिक कृतज्ञता निधीने दत्ता देसाई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेताना २००३ मध्ये त्यांना डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार दिला होता. आता पानसरे यांच्या नावाचा पुरस्कार देऊन पुन्हा एकदा त्यांच्या कामाचा गौरव होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 2:57 am

Web Title: datta desai
Next Stories
1 आंद्रे ब्राहिक
2 डॉ. यू. आर. राव
3 न्या. धनंजय चंद्रचूड
Just Now!
X