05 March 2021

News Flash

डेव्हिड बोव्ही

रॉकस्टार ही संकल्पना अस्तित्वात नसताना आपल्या संगीतातून तो त्या पदावर पोहोचला होता.

डेव्हिड बोव्ही 

 

रॉकस्टार ही संकल्पना अस्तित्वात नसताना आपल्या संगीतातून तो त्या पदावर पोहोचला होता. सुपरमॉडेल अशी पदवीच फॅशन जगतात अस्तित्वात नसताना तो सुपरमॉडेल म्हणून गणला गेला होता. विज्ञानकथांचे सुवर्णयुग असताना तो परग्रहवासी असल्याच्या वावडय़ांना ऊत आला होता. पाश्चात्त्यांना भावणारा ‘बुद्धिझम’ कोळून प्यायल्यावरही तो फॅसिस्ट हुकूमशाही तत्त्वांचा जाहीर पुरस्कार करीत होता. उपभोगशरण ‘पॉप्युलर कल्चर’वर विराजमान असूनही कला, संगीत आणि फॅशन आदींमध्ये आघाडीवर होता. संगीतकार, गीतकार, अभिनेता, चित्रकार, कलासमीक्षक आणि कित्येक भूमिकांमध्ये सर्वोच्च पद गाठणाऱ्या डेव्हिड बोव्ही या उभयलिंगी व्यक्तिमत्त्वाची छबी जगभर पसरली होती.

एमटीव्हीची निर्मिती अमेरिकेमध्ये १९८१ साली झाली. पुढे अल्पावधीत १६९ देशांना तिने वसाहत केले. मायकेल जॅक्सन ते मॅडोना आणि ब्रायन अ‍ॅडम्स ते निर्वाणा आदी शेकडो बॅण्ड आणि कलाकारांना घराघरांत पोहोचविण्यामध्ये आणि या कलाकारांना ‘स्टायलिस्ट परफॉर्मर’ बनविण्यात एमटीव्हीइतकी कुणीच मदत केली नाही. बोव्हीचे वैशिष्टय़ हे, की त्याची विचित्र आणि विक्षिप्तासमान आकर्षक शैली एमटीव्हीच्या आगमनाच्या आधीच तयार झाली होती. एमटीव्ही आगमनानंतर आपला ठसा उमटविण्यासाठी पॉप-रॉकस्टार्समध्ये (संगीत वैशिष्टय़ांसोबत केस वाढविलेले किंवा शून्य ठेवलेले, तऱ्हेवाईक पोशाख किंवा प्रसिद्धीयुक्त आचरट विधाने करण्याची) स्पर्धा लागली होती. तेव्हा बोव्हीसाठी सभागृहातील उत्साहवर्धनासाठी हमखास केल्या जाणाऱ्या या साऱ्याच गोष्टी जुन्या झाल्या होत्या. एमटीव्हीनंतर त्याची आधीच असलेली गडगंज प्रसिद्धी बुलेट ट्रेन वेगाने फोफावली.

मद्यपी बाप आणि आडमार्गाचे सर्व उद्योग करणाऱ्या ब्रिटनमधील कुटुंबात डेव्हिड रॉबर्ट जोन्स या नावानिशी त्याचे बालपण गेले. सॅक्सोफोन शिकलेल्या डेव्हिडने लोकप्रिय झाल्यानंतर दुसऱ्या कलाकाराच्या जोन्स या आडनावाशी साधम्र्य नको म्हणून बोव्ही हे आडनाव दत्तक घेतले. पुढे पहिले आचरट गाणे रेकॉर्ड करून तात्कालीन संगीत जगतात आपले हसे उडविले. १९६९ साली त्याने लिहिलेले ‘स्पेस ऑडिटी’ हे गाणे गाजले आणि त्याच्या शैलीसह व्यक्त होण्याचे प्रस्थ तयार झाले. विज्ञानकथांना आधार करून परग्रहाच्या संकल्पनांवरील त्याची गाणी आणि त्याने निर्माण केलेला प्रतिरूपी ‘झिग्गी स्टारडस्ट’ लोकप्रिय झाला. याच दरम्यान त्याने इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या आधारे रॉक संगीतामध्ये शब्दांपासून ध्वनीपर्यंत प्रयोगांवर प्रयोग राबविले.

या अचाट व्यक्तिमत्त्वाचा शेवटचा अल्बम त्याच्या मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी- म्हणजे गेल्या शनिवारी आला होता. रॉक संगीत, सिनेमा आणि कला या सर्वच क्षेत्रांमध्ये पाच दशके आपल्या नावाभोवतीचे वलय त्याने विस्तारत नेले. गेली दीड वर्षे त्याचा कर्करोगाचा आजार गुप्त असल्याने सोमवारी झालेला त्याचा मृत्यू संगीतजगताला धक्का देणारा ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 5:41 am

Web Title: david bowie
Next Stories
1 प्रा. वीरभद्रन रामनाथन
2 रवींद्र कालिया
3 लाभशंकर ठाकर
Just Now!
X