कसोटी क्रिकेटमध्ये आपले महत्त्व सिद्ध करूनही ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक डीन जोन्स एकदिवसीय प्रकारातील फलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणासाठी विशेष ओळखले जात. ‘आयसीसी’ क्रिकेट क्रमवारीअगोदर म्हणजे १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत ते जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजांपैकी एक मानले जात होते. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा ते आत्मविश्वासाने सामना करत. अप्रतिम पदलालित्यासह एकेरी-दुहेरी धावा काढताना जोखीम घेण्याची त्यांची वृत्ती लक्षवेधी होती. १९८४च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात ग्रॅहम यॅलपने दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोन्स यांना ऑस्ट्रेलियाच्या संघात संधी मिळाली. मग स्टीव्ह वॉ आजारी पडल्याने त्यांना कसोटी पदार्पण करता आले. या कसोटीत त्यांनी ४८ धावा केल्या. १९८६ मध्ये मद्रासच्या (आता चेन्नई) रंगतदार ‘टाय’ कसोटीमधील जोन्स यांनी २१० धावांची संस्मरणीय खेळी साकारून कसोटी क्रिकेटमधील स्थान भक्कम केले. उष्ण वातावरणात उलटय़ांचा त्रास होत असलेले जोन्स मैदान सोडण्याच्या तयारीत होते. मात्र कणखर कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांनी त्यांना क्वीन्सलॅण्डहून डिवचले. त्यानंतर जोन्स यांनी साकारलेली झुंजार खेळी ही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतात नोंदवलेली सर्वोच्च खेळी ठरली. १९८९ मध्ये अ‍ॅशेस मालिकेच्या यशातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९८४ ते १९९२ दरम्यानच्या ५२ कसोटी सामन्यांत त्यांनी ४६.५५च्या सरासरीने ३६३१ धावा काढल्या.

१९८७ मध्ये भारतात झालेल्या रिलायन्स विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या अनपेक्षित जेतेपदाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची आघाडीची फळी. सलामीवीर डेव्हिड बून आणि जेफ मार्शनंतर तिसऱ्या क्रमांकावर जोन्स फलंदाजीला उतरत. या स्पर्धेत जोन्स यांनी ४४च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह ३१४ धावा केल्या. १९९२च्या विश्वचषकातही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. मात्र १९९२-९३च्या हंगामात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली सरासरी राखूनही वादग्रस्तरीत्या त्यांना वगळण्यात आले. १९९४ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली, तेव्हा त्यांच्या खात्यावर १६४ सामन्यांत ४४.६१च्या सरासरीने सात शतके आणि ४६ अर्धशतकांच्या बळावर ६,०६८ धावा जमा होत्या. निवृत्तीनंतर समालोचन करताना त्यांनी हशिम अमलाला ‘दहशतवादी’ संबोधल्यामुळे टेन स्पोर्ट्सवर दिलगिरीची आणि जोन्स यांच्यावर गच्छन्तीची वेळी आली होती. पण पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून इस्लामाबाद युनायटेड व कराची किंग्ज संघांच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये त्यांनी अफगाणिस्तानचे प्रभारी प्रशिक्षकपद सांभाळले. ‘आयपीएल’च्या कार्यक्रमासाठी मुंबईत असलेले डीन जोन्स गुरुवारी निवर्तले.