News Flash

देबजानी घोष

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे आधुनिक भारताच्या घडणीत असाधारण योगदान आहे.

देबजानी घोष

 

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे आधुनिक भारताच्या घडणीत असाधारण योगदान आहे. आर्थिक वाटा तर आहेच, त्याचप्रमाणे उन्नत सांस्कृतिक-सामाजिक वातावरणाला आकार देण्यातही त्याने मोलाचा हातभार लावला आहे. अलीकडच्या काही दशकांत तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने माहिती-तंत्रज्ञान हेच प्रमुख रोजगार केंद्र बनल्याचे आढळून येते. परंतु या क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा जितका सहभाग तितके त्यांना या उद्योगाच्या उच्च व्यवस्थापनांत प्रतिनिधित्व नाही, अशा तक्रारीला जागा होती. आयटीतील नेतृत्व कायम पुरुषप्रधानच राहिले आहे. किंबहुना भारतातच नव्हे तर जगभरात अगदी सिलिकॉन व्हॅलीतील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशा स्थितीत भारताच्या माहिती-तंत्रज्ञान आणि आऊटसोर्सिग उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नासकॉम’सारख्या शिखर मंडळाची धुरा प्रथमच एका महिलेच्या हाती सोपविली गेली आहे. लिंगभाव-समानतेसाठी स्थापनेपासून तिसावे वर्ष या संघटनेला पाहावे लागले. देबजानी घोष या येत्या मार्च २०१८ पासून नासकॉमच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. चंद्रशेखर यांच्याकडून स्वीकारतील.

महिला कर्मचाऱ्यांचे आधिक्य असलेल्या बँकांमध्ये जशा आताशी महिला बँकप्रमुख मोठय़ा संख्येने दिसू लागल्या आहेत, त्याचप्रमाणे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये महिला नेतृत्वाला चालना देण्यास त्यांची ही नियुक्ती कारणीभूत ठरावी अशी आशा आहे. खरे तर घोष या भारतीय असल्या तरी त्या इंटेल या अमेरिकी कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून नासकॉमवर कार्यरत होत्या. इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिकापदावरून फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. घोष नासकॉमच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत असताना नासकॉम फाऊंडेशनच्या धर्मादाय कार्याचे त्यांच्याकडे म्होरकेपद होते. त्या वगळता नासकॉमवर कार्यरत महिलांची संख्याही एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत आहे, हेही आश्चर्यकारकच! संगीता गुप्ता, रुचिरा धर अशी काही नावेच त्या अंगाने पुढे येताना दिसतात. सध्याच्या काहीशा अडचणीच्या काळात आयटी उद्योगाचा आधारस्तंभ बनू शकणाऱ्या विविधता आणि सर्वसमावेशकतेचे महत्त्वच घोष यांच्या नियुक्तीने अधोरेखित झाले आहे, ही नासकॉमचे कार्यवाह रमण रॉय यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.

इंटेलमधून बाहेर पडल्यानंतर घोष सध्या येस बँकेच्या संचालक मंडळावर तसेच सिस्कोच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. नवोद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या स्वर्गदूत गुंतवणूकदार (एंजल इन्व्हेस्टर) म्हणूनही त्या भूमिका बजावत आहेत. इनक्लोव्ह या गतिमंद, विशेष सक्षम व्यक्तींसाठी अनुरूप जोडीदार शोधणाऱ्या संकेतस्थळाची त्या आर्थिक पाठराखण करीत आहेत. फिक्कीच्या ‘इनोव्हेशन समिती’चे प्रमुखपद त्यांच्याकडे होते. आता फुरसतीला वाव नसेल इतकी मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. तब्बल १५० अब्ज डॉलरची उलाढाल करणाऱ्या, २१०० भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्या सामाईक हितसंबंधांची जपणूक आणि संवर्धन त्यांना करावयाचे आहे.

भारताचे आयटी क्षेत्र संक्रमणातून वाटचाल करीत आहे. डिजिटलीकरण, स्वयंचलितीकरण आणि क्लाऊड-समर्थित तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब आजवरच्या प्रस्थापित चौकटीला धडका देत चालले आहे. ही उलथापालथ सुरू असतानाच, प्रथमच ब्रेग्झिटचा आघात, त्यापुढे ट्रम्पप्रणीत अमेरिकेत आणि नंतर उर्वरित सर्वच विकसित राष्ट्रांमध्ये कर्मचारी व्हिसाविषयक नियमांतील कठोरता भारतीय आयटी उद्योगापुढील मोठे आव्हान बनली आहे. महसुलातील वाढीची मात्रा जेमतेम, त्यामुळे नवीन नोकरभरतीचा विषय सोडाच, आहे त्या लोकांना कमी करणे भाग ठरत आहे. अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या या क्षेत्रातील रोजगाराचा संकोच अस्वस्थ करणारा असून, या तगमगीला शांत करणारा हळवा, हळुवार उतारा घोष यांच्याकडून दिला जाणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 1:44 am

Web Title: debjani ghosh
Next Stories
1 डॉ. लता अनंत
2 नजुबाई गावित
3 कुंवर नारायण
Just Now!
X