24 November 2017

News Flash

दीप्ती वानखडे

सुटीच्या दिवशी त्या गावी शेतात जात होत्या. त्यांना तेव्हापासूनच शेतीची आवड निर्माण झाली.

लोकसत्ता टीम | Updated: September 6, 2017 1:32 AM

दीप्ती वानखडे यांना ‘क्लीन टेक्नॉलॉजी’तील सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर संशोधनासाठी इस्रायलमध्ये प्रतिष्ठेची फेलोशिप मिळाली आहे

उच्चशिक्षणानंतर इतर तरुणींप्रमाणे दीप्ती वानखडे यांना चांगले आखीव रेखीव आयुष्य जगणे मुळीच अवघड नव्हते. पण शेतकरी कुटुंबातील दीप्तीचा पिंड निराळा होता. त्यांनी वेगळी वाट चोखाळली. राजकारणाच्या नावाने नाक मुरडणाऱ्या आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी ही युवती थेट ग्रामविकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली, केवळ गप्पा करून नव्हे, तर एका ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून! एवढय़ावरच ती थांबली नाही. थायलंडमधील विद्यापीठात धानाच्या शेतीवर संशोधन करण्यासाठी पोहोचली. डॉक्टरेट मिळवली. आता दीप्ती वानखडे यांना ‘क्लीन टेक्नॉलॉजी’तील सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर संशोधनासाठी इस्रायलमध्ये प्रतिष्ठेची फेलोशिप मिळाली आहे. त्यांनी आता इस्रायलमध्ये जाऊन संशोधनही सुरू केले आहे.

अमरावती जिल्ह्य़ातील विरूळ रोंघे हे दीप्ती वानखडे यांचे मूळ गाव. अमरावतीतून बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर दीप्ती यांनी परभणी कृषी विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मोठय़ा वेतनाची नोकरी त्यांना सहज मिळू शकली असली, पण कृषी क्षेत्रातील संशोधनाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दीप्ती यांचे वडील शेतकरी. सुटीच्या दिवशी त्या गावी शेतात जात होत्या. त्यांना तेव्हापासूनच शेतीची आवड निर्माण झाली.

अमरावतीच्या होलिक्रॉस इंग्रजी शाळेतून इयत्ता दहावी झालेली दीप्ती एक दिवस सरपंच होईल, असे भविष्य कुणी वर्तवले असते, तर त्याला लोकांनी नक्कीच मूर्खात काढले असते. पण कृषी विषयातील जिज्ञासा दीप्तींना सरपंचपदापर्यंत घेऊन आली. राजकारणाच्या वाटेला उच्चशिक्षित लोक जात नाहीत, हा एक समज. ग्रामपंचायत पातळीवर हे प्रमाण तर नगण्यच. अशा वातावरणात दीप्ती यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या निकटच्या लोकांसाठी ते आश्चर्यच होते. पण कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले. सदस्यपदी त्या निवडून आल्या. त्यानंतर सरपंचपदासाठीही संधी चालून आली आणि जिल्ह्य़ाच्या इतिहासात सर्वात कमी वयात सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. सरपंच म्हणून एक वर्षांचा कार्यकाळ त्यांनी सक्षमपणे सांभाळला. त्यांना उच्चशिक्षणाची ओढ होती. देशविदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि कृषीक्षेत्रात भरीव योगदान देण्याचा संकल्पच त्यांनी केला. २०१२ मध्ये उष्ण कटिबंधीय शेती या विषयावर आंतरराष्ट्रीय संशोधन करण्यासाठी त्यांची भारतातून निवड झाली. या विषयावर दीप्ती वानखडे यांनी थायलंडमध्ये संशोधन केले. तेथील कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केली. दीप्ती यांनी जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही सहभाग घेतला आहे. उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. याशिवाय बेल्जियममधील पर्यावरणविषयक परिषदेत त्यांनी सादरीकरण केले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये देश-विदेशातील विविध विद्यापीठांमध्ये आपल्या संशोधनाची चुणूक दाखवल्याने कृषी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळेच इस्रायल सरकारच्या विशेष उपक्रमासाठी भारतातून केवळ चार जणांची निवड झाली. त्यात दीप्ती यांचा समावेश आहे. भारत कृषिप्रधान असला, तरी संशोधनात मात्र अजूनही मागासलेपणच दिसून येते. उत्पादकतेच्या बाबतीत तर भारत लहान राष्ट्राच्या तुलनेतही अजून मागेच आहे. कृषीक्षेत्रात संशोधनासाठी भरपूर वाव असूनही विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे दिसून येत नाही. अशा स्थितीत दीप्ती यांची झेप लक्षवेधी ठरावी.

First Published on September 6, 2017 1:32 am

Web Title: deepti wankhede profile
टॅग Deepti Wankhede P