त्यांना वडिलांप्रमाणे दंतशल्यचिकित्सक व्हायचे होते, पण ते हृदयशल्यचिकित्सक बनले. अर्थात ही वेगळी वाट त्यांना अजरामर करून गेली, कारण अमेरिकेतील पहिली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे नाव डॉ. डेन्टन कुली. त्यांचे अलीकडेच निधन झाले.

कुली यांनी त्यांच्या आयुष्यात किमान १ लाख तरी हृदय शस्त्रक्रिया केल्या. आज या शस्त्रक्रिया सोप्या वाटतात, पण ज्या काळात त्यांनी हे काम सुरू केले तेव्हा तंत्रज्ञान आता इतके पुढे गेलेले नव्हते. हृदयविकारावर पूर्वी आता इतके इलाज किंवा शस्त्रक्रिया सोप्या नसताना कुली यांनी एका रुग्णात कृत्रिम हृदय बसवले होते. जगातील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान मात्र दक्षिण आफ्रिकेचे ख्रिश्चन बर्नार्ड यांनी त्याआधी पटकावला होता. कुली यांनी मुलांच्या हृदयाच्या झडपा बदलण्यातही तंत्रज्ञान विकसित केले होते. ४ एप्रिल १९६९ रोजी एका मरणाऱ्या रुग्णाला दात्याचे हृदय मिळत नव्हते, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी कृत्रिम हृदयप्रत्यारोपण केले. नैसर्गिक हृदय मिळेपर्यंत हास्केल कार्प नावाच्या इलिनॉइसच्या त्या रुग्णाला ६५ तास जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले, पण तो रुग्ण नंतर दगावला. कुली यांनी वापरलेले कृत्रिम हृदय हे ह्य़ूस्टनच्या बेलर कॉलेज येथे डिबेकी यांनी तयार केले होते व त्यांच्या परवानगीशिवाय त्याचा वापर कुली यांनी केला, असे डिबेकीयांचे म्हणणे होते, पण कुली यांनी मरणाऱ्या रुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात तसे केले असा युक्तिवाद त्यावर केला होता. वैद्यकीय क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणारी ती घटना होती व त्यासाठी कुली यांनी पोरकटपणे कृत्रिम हृदय चोरले, असा आरोप डिबेकी यांनी करायला कमी केले नव्हते. अमेरिकी सरकारने या प्रकाराची चौकशी करून कुली यांच्यावर ताशेरे ओढले. त्या वेळी मीच डिबेकी यांच्यापेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया केल्या होत्या व पहिले कृत्रिम हृदय बसवण्यास मीच योग्य शल्यचिकित्सक होतो, असा कुली यांनी दावा होता.  रशियाने अवकाश कार्यक्रमात अमेरिकेला मागे टाकले तसे हृदयशल्यचिकित्सेत मागे टाकू नये असे कुली यांना वाटत होते. त्यातून त्यांनी पहिली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया अमेरिकेत केली असेही सांगितले जाते. कुली यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२० रोजी ह्य़ूस्टन येथे झाला. विद्यार्थिदशेत अ‍ॅथलीट असल्याने आपण शल्यकर्मात प्रवीण झालो, असे कुली सांगत असत.बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स संस्थेतून त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली. हार्ट लंग मशीन वापरून शस्त्रक्रिया करताना द्याव्या लागणाऱ्या रक्ताचे प्रमाण त्यांनी कमी केले, ही त्यांची मोठी कामगिरी होती. विद्यार्थिदशेत त्यांच्या मनगट व बोटांवर खेळताना परिणाम झाला होता तरी ते वेगाने शस्त्रक्रिया करीत असत. ते तंत्रकुशल शल्यविशारद होते.  ज्या काळात  उपलब्ध साधने कमी अशा काळात त्यांनी केलेली ही कामगिरी  प्रशंसनीय होती यात शंकाच नाही. ते उत्तम हृदयशल्यविशारद आहेत हे त्यांचे प्रतिस्पर्धी डिबेकी यांनीही नंतर मान्य केले होते.