12 December 2017

News Flash

कृष्णराव मेढेकर

या गुणवत्तेच्या कसोटीवर तंतोतंत उतरलेला पोलीस अधिकारी म्हणूनही कृष्णरावांचेच नाव घेतले जाते.

लोकसत्ता टीम | Updated: September 26, 2017 2:17 AM

कृष्णराव मेढेकर

राजकारण, नोकरशाही किंवा अगदी उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रातही, ‘येस सर’ संस्कृतीचा उदय होण्याआधी, सुमारे तीन दशकांपूर्वी, जेव्हा राजकारणात आणि नोकरशाहीतही गुणवत्तेचाच आदर केला जायचा, तेव्हा आपल्या कर्तबगारीच्या जोरावरच देशाच्या पोलीस सेवेत कृष्णराव मेढेकर यांनी आपले नाव कोरले. ज्याला कोणत्याही अघटिताचा अगोदरच वास येतो, तो सर्वात यशस्वी पोलीस अधिकारी ठरतो असे म्हटले जाते. सामान्य माणसाला काहीसे दुर्लभच असलेले सहावे इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) कमालीचे कार्यक्षम असणे ही पोलीस अधिकाऱ्याची गुणवत्ता ठरते. या गुणवत्तेच्या कसोटीवर तंतोतंत उतरलेला पोलीस अधिकारी म्हणूनही कृष्णरावांचेच नाव घेतले जाते.

सर्वोच्च पद केवळ अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेण्यासाठी असते, याची जाणीव असलेल्या कृष्णराव मेढेकर यांनी महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून पद भूषवितानाच अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीही घडविले. या अधिकाऱ्यांनाही, ‘झुकणे’ माहीत नव्हते, म्हणूनच राज्याच्या पोलीस दलाचा देशभर दबदबा राहिला. १ फेब्रुवारी १९२७ हा कृष्णराव मेढेकर यांचा जन्मदिन. महाविद्यालयीन शिक्षणानंतर १९४९ मध्ये त्यांची सनदी पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली आणि जवळपास वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्र अक्षरश: गाजविला. त्यामुळे १९५६ मध्ये पुणे रेल्वे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यानंतर काही काळ मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली, पण लगेचच १९५८ मध्ये त्यांना केंद्रीय गुप्तवार्ता विभागात (आयबी) अतिरिक्त संचालक म्हणून केंद्र सरकारने दिल्लीत नेले. त्यांच्या चमकदार कारकीर्दीचा हा सुवर्णकाळ ठरला. या काळातच केंद्र सरकारने त्यांच्यावर ईशान्य भारतातील सातही राज्यांची जबाबदारी सोपविली आणि कृष्णरावांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये पोलीस यंत्रणेचे जाळे विणून आपले कौशल्य सिद्ध केले. १९७३ ते १९८० या काळात पुन्हा दिल्लीत दाखल झाल्यावर आयबीचे उपसंचालक म्हणून काम करतानाच कृष्णरावांवर एक आणखी जोखमीची जबाबदारी सोपविण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आदी पंतप्रधानांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. केवळ अधिकारी म्हणून वावरण्यापलीकडे, माणूस म्हणून परस्परांशी वागण्यासाठी स्वभावात एक वेगळे रसायन जपणे आवश्यक असते. कृष्णरावांनी ते जपले, म्हणून इंदिराजींसह साऱ्या नेत्यांनी कृष्णरावांना सन्मान दिला.

केंद्रातील प्रदीर्घ सेवेनंतर १९८०च्या सुमारास कृष्णराव मायभूमी महाराष्ट्राच्या राजधानीत दाखल झाले आणि राज्याला पोलिसांमधील माणूस पाहावयास मिळाला. १९८२ मध्ये राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालकपदाचा मान कृष्णरावांना मिळाला. तेव्हाची महाराष्ट्राच्या विधान भवनाची इमारत ही पुरातन वास्तू परंपरेतील एक महत्त्वाची इमारत होती. विधान भवनाची नवी इमारत बांधून झाल्यावर राज्याच्या पोलीस दलाच्या पालकत्वाची भूमिका सक्षमपणे बजावणाऱ्या कृष्णरावांकडे या ऐतिहासिक वास्तूचेही पालकत्व आले. नाशिकची पोलीस अकादमी हे कृष्णरावांच्याच दूरदृष्टीचे अपत्य!.. लाल फीतशाहीवर काडीचाही विश्वास नसलेला हा अधिकारी आपल्या निर्णयक्षमतेमुळे पोलीस दलाचा आदर्श बनला आणि निर्भीडपणे गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठीही तेवढय़ाच कठोरपणे अधिकाराचाही वापर त्यांनी केला. कृष्णरावांच्या काळात आणि त्यानंतरही निवृत्त झालेल्या अनेक अधिकाऱ्यांभोवती सुरक्षा कडे ठेवणे ही गरज ठरली होती, तेव्हा कृष्णराव मात्र, निर्भीडपणे एकटे समाजात सहजपणे वावरत असत. आपण गुंडांच्या विरोधात केलेल्या कारवाया हा आपल्या कर्तव्याचा भाग होता, त्यामुळे आपल्याशी कोणाचीही वैयक्तिक वैर असणे संभवतच नाही अशी त्यांची खात्री होती. कृष्णरावांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची ही खात्री खरी ठरली.

एक कर्तव्यदक्ष अधिकारी, एक चांगला माणूस आणि एक आदर्श नागरिक अशी अनेक रूपे सामावलेल्या कृष्णरावांचे रविवारी मुंबईत निधन झाले. पण पोलीस दलाच्या इतिहासावरील त्यांचे अस्तित्व तेवढय़ाच तेजाने झळकत राहणार आहे.

First Published on September 26, 2017 2:17 am

Web Title: dgp k p medhekar