रुपेरी पडद्यावरचे भयभूत म्हणजे रामसे बंधू, हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात घट्ट बसवण्याचे काम आपल्या भयपटांच्या माध्यमातून रामसे बंधूंनी केले. सत्तर-ऐंशीच्या दशकांत हिंदी चित्रपटसृष्टी एक तर कौटुंबिक किंवा साचेबद्ध प्रेमकथांमध्ये अडकली होती, तेव्हा प्रेक्षकांना यापलीकडचे काही तरी हवे आहे, याचा शोध या सात बंधूंपैकी दोन बंधूंना लागला. ते होते तुलसी आणि श्याम रामसे. रामसे बंधूंच्या भयकथा पडद्यावर आणण्यात आणि ते शैतानी आत्मे पडद्यावर जिवंत करण्यात तुलसी आणि श्याम यांचा मोठा वाटा होता. त्यातले तुलसी यांचे गतवर्षी निधन झाले, तर श्याम रामसे हे बुधवारी निवर्तले.

रामसे बंधूंच्या वडिलांनी चित्रपटनिर्मितीत उतरायचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी ‘शहीद-ए-आझम भगतसिंग’ आणि ‘रुस्तूम सोहराब’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. मात्र सत्तरच्या दशकात प्रेक्षकांना वेगळे काही तरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या तुलसी आणि श्याम यांनी भयपटांची निर्मिती करण्याचा निर्धार केला. कुटुंब रंगलंय भयपटात.. अशी अवस्था असलेल्या या कुटुंबात दिग्दर्शनाची धुरा ही श्याम रामसे यांच्या खांद्यावरच होती. ‘दो गज जमीन के नीचे’ या चित्रपटापासून रामसेंच्या भयपट साम्राज्याची सुरुवात झाली. सत्तरचे हे दशक रामसेंसाठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही महत्त्वाचे ठरले. तोवर भयपट हिंदीत आलेच नव्हते असे नाही, मात्र रामसेंनी भयपटांचा धडाकाच सुरू केला.

श्याम रामसे यांनी जवळपास २५ भयपटांचे दिग्दर्शन केले होते. हे सगळेच भयपट उच्च दर्जाचे नव्हते, मात्र या चित्रपटांनी आपला असा एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. ‘दरवाजा’, ‘पुरानी हवेली’, ‘वीराना’.. अशी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या भयपटांची यादी मोठी आहे. काळ बदलतो तशी प्रेक्षकांची अभिरुचीही बदलते, याचे भान श्याम यांना सुरुवातीपासूनच होते. त्यामुळे ऐंशीचे दशक संपता संपता दूरचित्रवाहिन्यांकडे वळलेल्या प्रेक्षकांचा कल पाहून भयपटांचा ‘रामसे ब्रॅण्ड’ तिथेही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न श्याम यांनी केला. ‘झी हॉरर शो’ ही त्यांनी आणलेली पहिलीच मालिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर ‘सॅटर्डे सस्पेन्स’, ‘एक्सझोन’सारख्या कार्यक्रमांचेही काही भाग त्यांनी दिग्दर्शित केले. २००० साली पुन्हा भयपटांकडे वळलेल्या श्याम रामसे यांनी मुलगी साशा हिच्याबरोबर २००३ साली ‘धुंद : द फॉग’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. अर्थातच, तोवर चित्रपटनिर्मितीचे तंत्रच बदललेले असल्याने नंतर आलेले चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत. मात्र दोन दशके रामसे यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत भयपटांचे पर्व निर्माण केले, ते कोणीही विसरू शकणार नाही.